उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!
schedule09 May 25 person by visibility 350 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आयोजित पदाधिकारी मेळाव्यात पक्षातील गटबाजीवरुन अनेकांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही संघटनेचे काम करायला तयार आहोत, पण नेते मंडळीतील वाद कधी मिटणार ’असा सवालही उपस्थित केला. दरम्यान संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी गटबाजीवरुन स्थानिक नेते मंडळींना कानपिचक्या दिल्या. दरम्यान पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात कोल्हापूर दौरा आहे. या दौऱ्यात पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा होणार असून यामध्ये ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.’असेही दुधवडकर यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दुधवडकर यांनी घेतली. गुरुवारी (8 मे 2025) सर्किट हाऊस येथील बैठकीत बोलताना त्यांनी, बूथ आणि गटनिहाय पदाधिकाऱ्यांची यादी तयार कराव्यात अशा सूचना केल्या. भाषणात त्यांनी, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले यांना उद्देशून कोल्हापुरात शिवसेनेचे किती नगरसेवक आहेत, दक्षिण मतदारसंघात नगरसेवकांची संख्या किती आहे ? अशी विचारणा केली. बूथ यादी मागूनही का दिली नाही असा सवाल केला. इचलकरंजीतील पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी नगरसेवक, बूथनिहाय कामगिरी यावरुन जाब विचारला.तालुकाप्रमुखांनाही खडेबोल सुनावले.
या बैठकीला शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, वैभव उगळे, प्रा. सुनील शिंत्रे, हर्षल सुर्वे, दीपक गौड, मंजीत माने, शशिकांत बीडकर, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, जयसिंग टिकिले, दिलीप माने, महिला आघाडीच्या स्मिता सावंत, प्रतिज्ञा उत्तुरे, रिमा देशपांडे आदी उपस्थित होते.