सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!
schedule08 May 25 person by visibility 140 categoryउद्योग

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी त्यांची सोमवारी, (पाच मे २०२५) रोजी निवड झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संचालकांसमोर बोलताना त्यांनी, ‘आपणं बोलतो कमी, पण आपला काम करण्यावर अधिक भर असतो. शेतकरी संघाला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी आपला प्रयत्न राहील. येत्या वर्षभरात या कामाचा अनुभव तुम्हाला वारंवार येत राहिल’अशा शब्दांत आश्वस्त केले होते. अवघ्या चार दिवसातच त्यांनी त्यांच्या कृतीशील कामाची ओळख घडविली. गेली दोन महिने बंद असलेला रुकडी येथील खत कारखाना गुरुवारी (८ मे) सुरू केला. शेतकरी संघासाठी ही दिलासादायक चिन्हे आणि तो बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक फोकस असणारा हा आश्वासक चेहरा आहे, नूतन अध्यक्ष, प्रा. बाबासाहेब शिंदे यांचा !
शेतकरी सहकारी संघ हा एकेकाळी नावाजलेला संघ. संघाची उत्पादने तर विश्वासार्हतेची प्रतिके. ग्राहकांचा विश्वासही संघावर दांडगा. यामुळे संघांची भरभराट होत गेली. मात्र पंधरा-वीस वर्षापूर्वी संघात राजकारण शिरले आणि संघांची पिछेहाट होत गेली. संघाच्या मालमत्तेची विक्री करण्याची नामुष्की ओढावली. संघ पिछाडीवर पडला पण संघातील राजकारण काही संपले नाही. समर्थकांना खुर्ची मिळवून देण्यासाठी नेते मंडळींनी संघाचा वापर केला. त्यामध्ये सगळेच पक्ष सामील. संघाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रत्येकांनी भली मोठी भाषणे केली. संघाला उर्जितावस्था प्राप्त करुन देऊ, काटकसरीचा कारभार करू…पण नव्याचे नऊ दिवस अशीच स्थिती होती.
काहींनी प्रामाणिक प्रयत्न केले, पण कधी संचालकांतील कुरघोडी तर कधी सर्वपक्षीय राजकारणाचा फटका यामुळे अनेकांच्या शेतकरी संघाच्या विकासाच्या संकल्पना मूर्त रुपात आल्या नाहीत. निवडणुका झाल्या की, नेते मंडळी सुद्धा अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतच लक्ष घालू लागले. वर्षभर संघाची काय अवस्था असते हे जाणून घ्यावे असे कुणाला वाटत नसल्यासारखी स्थिती आहे. नेहमीप्रमाणे नुकतीच संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडी झाल्या. अध्यक्षपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रा. बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अपर्णा अमित पाटील यांची निवड झाली. प्रा. बाबासाहेब शिंदे हे शांत, संयम व्यक्तिमत्व. मितभाषी. पदाधिकारी निवडीनंतर बोलताना अध्यक्ष शिंदे यांनी त्यावरही भाष्य केले.
‘मी जास्त बोलत नाही, कमी बोलतो. पण माझा भर हा कामावर आहे. संघाला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ’अशी भाषणाची सुरुवात करत त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. मंगळवारी त्यांनी, संघाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. विभागनिहाय चर्चा केली. उत्पन्न वाढीबाबत मते जाणून घेतली. बुधवारी त्यांनी, रुकडी येथील खत कारखान्याला भेट दिली. संचालक राजसिंह शेळके, आनंदा बनकर, कार्यकारी संचालक ए आर. मुल्ला सोबत होते.
हा कारखाना एक मार्चपासून बंद आहे. संघाचा खत हा लोकप्रिय. मात्र खत निर्मितीसाठी आवश्यक घटकांची उपलब्धता नसल्यामुळे खत निर्मिती नाही. अध्यक्ष शिंदे यांनी खत कारखाना सुरू करण्यासंबंधी चर्चा केली. खत निर्मितीसाठी आवश्यक घटकांची खरेदी करायला प्रशासनाला सूचना केल्या. आणि तत्काळ उत्पादनाला सुरुवात करण्याचे ठरले. त्यानुसार गुरुवारपासून रुकडी येथील खत कारखाना सुरू झाला. अध्यक्ष शिंदे यांनी एवढयावरच न थांबता शेतकरी संघाच्या इतर विभागांची झाडाझडती घेऊन एकेक विषय मार्गी लावायला हवेत…तरच कामाचा धडाका राहील. तसेच आमदार विनय कोरे यांनी ज्या विश्वासाने जबाबदारी सोपवली आहे तो ही सार्थकी ठरेल. अन्यथा ये रे माझ्या मागल्या…सारखी स्थिती काही संपणार नाही