शिक्षक संघाच्या राज्य संपर्कप्रमुखपदी राजमोहन पाटील, उपाध्यक्षपदी तानाजी पवार ! विभागीय अध्यक्षपदी रवींद्र नागटिळे !!
schedule21 Mar 25 person by visibility 409 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाच्या राज्य संपर्कप्रमुखपदी राजमोहन जगन्नाथ पाटील, उपाध्यक्षपदी डॉ. तानाजी पवार तर पुणे विभागीय अध्यक्षपदी रवींद्र नागटिळे यांची निवड झाली.
राज्य शिक्षक संघाच्या (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) कार्यकारी मंडळ सभा नुकतीच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर हॉल येथे झाली. याप्रसंगी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते माधवराव पाटील, राज्याध्यक्ष केशवराव जाधव, राज्य नेते वि. आर. भालतडक, राज्य नेते व मार्गदर्शक राजाराम वरुटे, राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, सरचिटणीस लायक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा झाली. या सभेला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी संबोधित करताना शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करू अशी ग्वाही दिली.
राजमोहन पाटील हे १९९२ पासून शिक्षक म्हणून काम करत आहेत. सहा शाळेत शिक्षक म्हणून काम केले आहे. विद्यार्थी व शाळेसाठी उत्कृष्टरित्या काम करण्याला प्राधान्यक्रम दिला आहे.२००२ पासून संघटनेते पदाधिकारी म्हणून सक्रिय आहेत. २००६ मध्ये हातकणंगले तालुकाध्यक्ष होते. शिक्षक बँकेत संचालक म्हणून तेरा वर्षे प्रतिनिधीत्व केले. शिक्षक बँकेचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी हातकणंगले तालुक्यातील शिक्षक डॉ . तानाजी आनंदराव पवार यांची निवड झाली. गेली २८ वर्षे ते शिक्षकी पेशामध्ये काम करत आहेत. हातकणंगले तालुका शाखा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण समिती सदस्यपदी २०२१-२३ या कालावधीत काम केले आहे. आनंदगंगा फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवितअसतात.
शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र बाबुराव नागटिळे यांच्याकडे पुणे विभागीय अध्यक्षपदाची धुरा सोपविली आह. नागटिळे हे गेली पंचवीस वर्षे शिक्षक संघात कार्यरत आहेत. १९९९ ते २००५ या कालावधीत शिक्षक बँकेचे संचालक होते. बँकेचे व्हाइस चेअरमनपदी काम केले आहे. भुदरगड तालुक्यतील डॉ. जे. पी. नाईक प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. ते म्हसवे येथील आहेत.