राधानगरी धरण तुडुंब, कळंबा ओसांडला! पंचगंगा धोकादायक वळणावर !!
schedule24 Jul 24 person by visibility 995 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिवसभर कोसळणारा पाऊस, धरणातून वाढलेला पाण्याचा विसर्ग, नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ यामुळे जिल्ह्याला महापुराचा विळखा घट्ट होत असल्याची चिन्हे आहेत. पंचगंगा नदी धोकादायक वळणाकडे वाहत असल्याने नदीकाठावरील नागरिक स्थलांतर करत आहेत. रात्री आठ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ४२ फूट सात इंचापर्यंत वाढली आहे. ४३ फुटाला धोका पातळी आहे. जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्हा प्रशासनाने, नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. काही ठिकाण नागरिकांनी स्थलांतर केले आहे. अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने राधानगरी, काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. परिणामी जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. राधानगरी धरण जवळपास ९५ टक्के भरले आहे. धरणाचा स्वयंचलित दरवाजा कोणत्याही क्षणी उघडू शकते अशी स्थिती आहे. राधानगरी धरणातून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढल्याने भोगावती नदी पात्राबाहेर पडली आहे. कोल्हापूर नजीकचा कळंबा तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरुन पाणी ओसांडत आहे. कसबा बावडा-शिये मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. आजरा तालुक्यातील चित्री मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरुन १२४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणा पायथा विद्युत निर्मिती केंद्रातून नदीमध्ये १६०० घनफूट प्रतिसेकंद (क्युसेक) पाणी सोडले जाऊ शकते यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन दूधगंगा धरण व्यवस्थापनने केले.
दिवसभरात पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास एका फुटाने वाढली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ४१ फूट दहा इंच इतकी पाणी पातळी होती. सकाळी आठ वाजेपर्यंत तीन इंचानी पाणी वाढत ४१ फूट एक इंचावर पोहोचली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राधानगरी धरण ९३. ८१ टक्के भरले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीची पाणी पातळी ४२ फूट पाच इंचापर्यंत गेली. रात्री आठ वाजता आणखी दोन इंचानी पाणी पातळी वाढली आहे.
बुधवारी, चिखली येथील नागरिकांनी स्थलांतर सुरू केले आहे. हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे एका घराची पडझड झाली. शिरोळ तालुक्यातही जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविली जात आहेत.वारणा धरणातून सकाळी ११. ३० वाजता पूर्वी सुरु असलेल्या ३८०० क्युसेक विसर्गात वाढ करुन वक्रदरवाज्यातून ७२१६, पॉवर हाऊसमधून १६५८ असे एकूण ८८७४ क्युसेक विसर्ग सुरू झाला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.