प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतकमहोत्सवी विशेष लोगोचे रविवारी अनावरण
schedule10 Aug 26 person by visibility 58 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉल जगतातील नावाजलेल्या प्रॅक्टिस फुटबॉल क्लब शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 1927 मध्ये स्थापन झालेल्या प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यंदाच्या फुटबॉल हंगामा पासून शतक महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. त्यानिमित्त शतकमहोत्सवी विशेष लोगोचे अनावरण 16 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित केले आहे अशी माहिती क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत व रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
जयप्रभा स्टुडिओ जवळील शुभंकरोती सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी सहा वाजता हा समारंभ होणार आहे. या लोगोचे अनावरण भारतीय महिला फुटबॉल संघाच्या कोच प्रिया पी.व्ही. (केरळ) यांच्या हस्ते होणार आहे. महापौर रुपाराणी निकम या अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. याप्रसंगी मधुरिमाराजे छत्रपती, अरुंधती महाडिक, वैशाली क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. लोगो अनावरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर फुटबॉल कोच प्रिया या कोल्हापुरातील महिला फुटबॉल खेळाडूशी संवाद साधणार आहेत. कोल्हापुरात फुटबॉल खेळणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीय आहे. त्या खेळाडूंना फुटबॉलमधील करिअर संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. मागील शंभर वर्षात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने राज्य व देश पातळीवरील अनेक फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच तयार केले. प्रॅक्टिस क्लबच्या मागील शंभर वर्षाच्या इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी 2027 हे वर्ष प्रॅक्टिस क्लब शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरी करीत आहे. या निमित्ताने वर्षभर फुटबॉल खेळाविषयी विविध कार्यक्रम, 1960 पासून आतापर्यंत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून खेळलेल्या खेळाडूंचा सत्कार व कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित केले जाणार आहे. तसेच प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या वाटचालीवर आधारित स्मरणिका प्रकाशित करण्याचे नियोजित आहे. याशिवाय क्लबच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत असे संयोजकांनी सांगितले पत्रकार परिषदेला मारुती सावंत, चंद्रशेखर देशपांडे, अनिल महाजन आदी उपस्थित होते