शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी आमचा लढा
schedule22 Oct 26 person by visibility 27 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘ शिक्षकांना शिकवू द्या…आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या’ यासाठी आमचा लढा आहे. चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी पहिल्यांदा शिक्षकांची शाळाबाह्य कामातून मुक्त करायला हवे.’अशी स्पष्ट भूमिका पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीतंर्गत काँग्रेसचे उमेदवार व विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी मांडली.
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीतंर्गत काँग्रेस पक्षाकडून प्रा. आसगावकर हे निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांना, शिक्षक मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. २०२० ते २०२६ या कालावधीत त्यांनी शिक्षक आमदार म्हणून पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. शिक्षकांशी निगडीत प्रत्येक प्रश्नावर आंदोलनात आघाडीवर राहिले. सभागृहात आवाज उमटविला. सहा वर्षे आमदार म्हणून केलेल्या कामाच्या बळावर ते पुन्हा एकदा निवडून द्या अशी साद शिक्षक मतदारांना घालत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे अशा पाचही जिल्ह्यात त्यांनी संपर्क दौरा काढला. शिक्षकांचे मेळावे घेत भूमिका मांडली आहे. पाचही जिल्ह्यातून शिक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शिक्षकांची शाळा बाह्य कामे बंद करावीत. तरच शिक्षक पूर्ण क्षमतेने शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करू शकतील. शिक्षकांना शिकवू द्या…मुलांना शिकू द्या यासाठी आमची लढाई सुरू आहे. २०१३ पूर्वीचे जे शिक्षक सेवेत आहेत, त्यांना टीईटीतून मुक्त करावे. प्रचलित धोरणानुसार टप्पा अनुदान मिळायला पाहिजे. सगळयात महत्वाचं म्हणजे १९८२ ची जुनी पेन्शन योजना सर्व घटकांना मिळायला हवी. ज्युनिअर कॉलेज संचमान्यतेचे निकष पूर्वीप्रमाणे असावेत. ’असे आमदार आसगावकर यांनी स्पष्ट केले. शिक्षकांशी निगडीत विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनापासून मंत्रालय पातळीपर्यंत पाठपुरावा करुन न्याय मिळवून दिला आहे. आमदार म्हणून काम करताना साऱ्या घटकांना सोबत घेऊन काम केल्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक मतदार आपणाला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.