प्रभाकरपंत कोरगांवकर हे समाज परिवर्तनाचे माध्यम होते-प्राचार्य ईस्माइल पठाण
schedule17 Sep 25 person by visibility 29 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रभाकरपंत कोरगावकर हे समाज परिवर्तनाचे मोठे माध्यम आहे.त्यांच्या दातृत्वातून अनेक संस्था व व्यक्ती यांना खूप मोठी मदत झालेली आहे’ प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहाजी महाविद्यालयातील विठ्ठल रामजी शिंदे सभागृहात प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमाले अंतर्गत महाराष्ट्राचे समाजजीवन व परिवर्तन या विषयावर प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण यांचे व्याख्यान झाले. या प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीमती पल्लवी कोरगांवकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मराठी विभागाच्या वतीने समाज परिवर्तन या भिंतीपत्रकाचे तसेच शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या वरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले ,प्रभाकरपंत कोरगांवकर यांनी महात्मा गांधींचे विचार आपल्या आचरणातून पुढे नेले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे सुचेता कोरेगावकर आणि पल्लवी कोरगावकर याही पुढे चालवत आहेत. पल्लवी कोरगावकर म्हणाल्या, प्रभाकरपंत कोरगावकर यांची राहणी साधी होती पण त्यांचे दातृत्व मोठे होते. दान देताना सुद्धा ते कुणालाही कळू देत नसत .त्यांनी आपल्या वाट्याची सर्व संपत्ती कोरगावकर ट्रस्टच्या माध्यमातून समाजच्या मालकीची केली. हजारो लोकांना, विद्यार्थ्यांना, गरजूंना त्यांची मदत झालेली आहे. त्यांच्या कार्याचा वसा आम्हीही पुढे नेत आहोत. प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या निमित्ताने नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार नेण्याचा आमचा हा एक उपक्रम आहे. कोरगावकर ट्रस्टचे सेक्रेटरी विजय हिंगे ,आंतरभारती शिक्षण संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी भरत शास्त्री, सेक्रेटरी एम. एस. पाटोळे उपस्थित होते. डॉ. डी.के.वळवी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रचना माने व डॉ. पी. बी. पाटील यांनी संयोजन केले. डॉ. पल्लवी कोडक यांनी आभार मानले.