गोकुळ परिवारतर्फे रवींद्र आपटेंना आदरांजली, आठवणींनी चेअरमनासह संचालक गहिवरले
schedule07 Nov 24 person by visibility 135 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) माजी चेअरमन स्वर्गीय रवींद्र पांडुरंग आपटे यांना गोकुळ परिवारातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते आपटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपटे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, १९८६ पासून सलग ३५ वर्षे गोकुळचे संचालक आणि चार वर्ष अध्यक्ष असणारे आपटे हे सहकार व दुग्ध व्यवसायतील राष्ट्रीय अभ्यासक होते. त्यांच्या निधनाने दुग्ध व्यवसायातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले. तसेच गोकुळच्या जडणघडणी मोलाचे योगदान त्यांनी दिले. संघ हिताच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली होती. दूध उत्पादकांच्या समस्या ते सातत्याने मांडत होते, त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे गोकुळने चांगली प्रगती केली.
याप्रसंगी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील -चुयेकर तसेच संघाचे अधिकारी डॉ.प्रकाश साळुंखे, शरद तुरंबेकर, मुंबईचे वितरक एस.एम.स्वामी यांनी मनोगतात आपटे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
तसेच संघाच्या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव, बोरवडे शीतकरण केंद्र, लिंगनूर शीतकरण केंद्र, तावरेवाडी शीतकरण केंद्र, गोगवे शीतकरण केंद्र, सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल / गडमुडशिंगी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संचालक संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, मुंबईचे वितरक एस.एम.स्वामी, राजू पाटील, प्रकाश शिंदे उपस्थित होते.