कोल्हापूर फर्स्ट उपक्रम शहर-जिल्हयाच्या सर्वांगिण-शाश्वत विकासासाठी क्रांतिकारी ठरेल
schedule09 Mar 25 person by visibility 409 categoryउद्योग

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापुरातील चौदा संस्था…प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र वेगवेगळे…ज्या त्या क्षेत्रातील त्या शिखर संस्था…प्रत्येकाचे कार्यक्षेत्र भिन्न असले तरी साऱ्यांच्या अजेंडयावर कोल्हापूरचा शाश्वत विकास हे समान सूत्र. प्रत्येकाचा आपआपल्या पातळीवर कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा…चौदा संघटनांची ही विखुरलेली ताकत एकवटली आणि साकारले ….‘कोल्हापूर फर्स्ट’हा प्लॅटफॉर्म. कोल्हापूरचे ऐतिहासिक, धार्मिक महत्व अबाधित ठेवून विकसित शहर आणि जिल्हा उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम ठरला. रविवारी (९ मार्च २०२५) रोजी या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे. हॉटेल पॅव्हेलियन येथे हा कार्यक्रम होत आहे.
‘सरकार पातळीवर पाठपुरावा आणि प्रशासनाशी सुसंवाद हे कामकाजाचे सूत्र ठरवून कोल्हापुरात विकासाची चळवळ गतीमान करणे. कोल्हापूरला आधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाच्या संधी देण्याचा प्रयत्न आहे. त्याद्वारे औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना…’या शब्दांत कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी भूमिका मांडली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत हे सहसमन्वयक आहेत.
प्रश्न – कोल्हापूर फर्स्ट उपक्रमाची नेमकी संकल्पना काय आहे ?
उत्तर –‘ कोल्हापूर फर्स्ट : कोल्हापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ हे आमचे सूत्र आहे. या उपक्रमात सहभागी संस्था या लोकांशी, विविध घटकांशी निगडीत आहेत. चौदा संघटना एकवटल्या आहेत. या संस्था, संघटना कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. साऱ्यांच्या विचारविनिमयातून, एकत्रितपणे विविध विकास प्रकल्पांना गती दिली जाईल. उणीदुणी न काढता भविष्यकालीन उज्ज्वल कोल्हापूरसाठी आम्ही काम करणार आहोत.’
प्रश्न : कोल्हापूर फर्स्ट नेमक्या कोणत्या बाबीवर फोकस ठेवणार आहे ?
उत्तर –कोल्हापूर फर्स्ट हा उपक्रम कोल्हापूरच्या सर्वांगिण आणि शाश्वत विकासासाठी क्रांतिकारी ठरणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडे शहर आणि जिल्हयाच्या विकास प्रकल्पासाठी पाठपुरावा आणि मंजूर प्रकल्पांची प्रभावी व गतीमान अंमलबजावणीसाठी प्रशासनाशी संवाद या पद्धतीने ‘कोल्हापूर फर्स्ट’चे कामकाज राहील. यामुळे विविध घटक या उपक्रमात समाविष्ठ आहेत. शहर आणि जिल्हयाच्या सर्वांगिण विकासाशी निगडीत अकरा प्रकल्प निश्चित केले आहेत.
प्रश्न –कोल्हापूर फर्स्टच्या अजेंडयावरील ते अकरा विषय कोणते ?
उत्तर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करणे, १०० एकर क्षेत्रावर आधुनिक आयटी पार्क विकसित करणे, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती, नवीन एमआयडीसी आणि मोठया उद्योगांच्या स्थापनेसाठी प्रयत्न, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा सुविधांचा विकास, कोल्हापूरसाठी स्वतंत्र प्रशासकीय विभाग-आयुक्तालयाची स्थापना, कोल्हापूर शहराची हद्दवाढ करुन नियोजनबद्ध शहरीकरण, कोल्हापूरला मेडिकल हब म्हणून विकसित करणे, सौरऊर्जेच्या मदतीने लघु आणि मध्यम उद्योगांना स्वस्त वीज पुरवठा, कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्हयासाठी टुरिझम सर्किट तयार करुन पर्यटनाचा विकास, फाऊंडी आणि इंजिनीअरिंग हबचा विकास…अशा अकरा विकास प्रकल्पांसाठी कोल्हापूर फर्स्ट पाठपुरावा करणार आहे.
……………
सहभागी संघटना
कोल्हापूर फर्स्ट या उपक्रमात विविध संस्था, संघटना सहभागी आहेत.ज्या त्या क्षेत्रातील शिखर संस्था म्हणून त्यांची ओळख आहे. यामध्ये कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूर, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, क्रीडाई कोल्हापूर, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, सीआयआय साऊथ महाराष्ट्र, आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आयआयएफ कोल्हापूर चॅप्टर, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स, कोल्हापूर सीए असोसिएशन.