६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन
schedule25 Nov 24 person by visibility 108 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीला सोमवारी उत्साहात सुरुवात झाली. २५ नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत पासून राज्यातील विविध २४ जिल्हास्तरावरील केंद्रांवर स्पर्धा होत आहेत. राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर या केंद्रावरील स्पर्धेचे उदघाटन राजर्षी शाहू स्मारक भवन येथील सभागृहात झाले.
अखिल भारतीय नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे करण्यात आले. यावेळी परीक्षक अविनाश कोल्हे, प्रवीण शांताराम, पूर्वा खालगावकर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते आबा कुलकर्णी, कोल्हापूर लिथो प्रेसचे हर्षराज कपडेकर, राजर्षी शाहू स्मारक भवन येथील ज्येष्ठ कर्मचारी आनंदा देसाई यांचा सन्मान त्यांचा नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल करण्यात आला. पहिल्या दिवशी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाने सुरुवात झाली.
सृजन आणि सर्जनचा अविष्कार वेगवेगळ्या सहभागी २० नाट्य स्पर्धकांमार्फत सादर होणार आहे. यामध्ये ऐतिहासिक पद्धतीचे नाट्य पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नाट्य रसिकांना ती शाहू स्मारक नाट्यगृहात पाहायला मिळणार आहेत. यंदाची स्पर्धा शाहू स्मारक भवन येथे येत्या १५ डिसेंबरपर्यंत असणार आहे. उद्घाटन सोहळ्यात सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत जोशी यांनी पाहिले. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.