जिप सोसायटीची कमाल, वार्षिक सभेदिवशीच लाभांश सभासदांच्या खात्यावर- चेअरमन सुनील पाटील
schedule08 Jun 25 person by visibility 608 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीमार्फत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सभासदांना १२.५० टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. सगळया सभासदांची लाभांशाची एकूण रक्कम एक कोटी ३३ लाख इतकी आहे. विशेष म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेदिवशीच लाभांशाची रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे अशी घोषणा सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील यांनी सभेत केली.
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचरी सहकारी सोसायटीची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (८ जून २०२५) सुरळीत व खेळीमेळीत पार पडली. याप्रसंगी सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. साईक्स एक्स्टेंशन येथील सोसायटीच्या श्री महालक्ष्मी सभागृहात आयोजित या वार्षिक सभेत चेअरमन पाटील यांनी लाभांश वाटपाची घोषणा करताच सभासदांनी टाळया वाजवत स्वागत केले. या सभेत चेअरमन पाटील यांनी, सोसायटीच्या २०२४-२५ चा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, वार्षिक आढावा मांडला. सभेत, विषयपत्रिकेवरील सातही विषय मंजूर झाले. व्यवस्थापक व्ही. एन. बोरगे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. तत्पूर्वी चेअरमन पाटील यांनी अर्धा तासाच्या भाषणात संस्थेच्या प्रगतीचा चौफेर आलेख मांडला. ‘सभासदहित डोळयासमोर ठेवून संचालक मंडळ काम करत आहे. २०२० पासून सोसायटीला अ ऑडिट वर्ग मिळत आहे. जे चांगले आहे त्याचे कौतुक आणि जे चुकीचे आहे ते दुरुस्त करू या. सभासदांना अभिमान वाटेल असे कामकाज करू.’अशा आश्वासक शब्दांत भाषणाला सुरुवात करत चेअरमन पाटील यांनी विविध योजनांचा ऊहापोह केला.
सोसायटीचा नफा तीन कोटी ३५ लाखावर
चेअरमन पाटील म्हणाले, ‘३१ मार्च २०२५ अखेर सोसायटीला ३ कोटी ३५ लाख १३ हजार २४८ रुपये नफा झाला आहे. ३१ मार्च अखेर २११ कोटी ८८ लाखाच्यो ठेवी तर २१७ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज वाटप आहे. कायम ठेवीवर ९.२५ टक्के दराने दोन कोटी ७१ लाख रुपये व्याज व वर्गणी ठेवीवर ८.२५ टक्के दराने एक कोटी ४४ लाख रुपये व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेची उलाढाल ८६४ कोटी ८५ लाखावर पोहोचली आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या, तसेच चार व त्यापेक्षा कमी हप्ते थकबाकी असणाऱ्या सभासदांच्या नियमित कर्जावर २०२४-२५ वर्षासाठी ०.४० टक्के व्याज रिबेट देण्यात येणार आहे.. यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना २०२४-२५ वर्षासाठी कर्जाचा व्याजदर ८.८५ टक्के असा राहील. सभासदांसाठी महालक्ष्मी फंड ठेव वृद्धी योजना सुरू केली असून अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे.’
…………..
उलाढाल दुप्पट होऊनही नफ्याचे प्रमाण कमी कसे ? सभासदांकडून कामकाजाचे अभिनंदन
सभासद मनोजकुमार रणदिवे यांनी सोसायटीची उलाढाल ८६४ कोटीवर पोहोचले आहे. मागील काही वर्षाच्या आकडेवारी नजर टाकली तर उलाढाल दुप्पट झाली, मग नफ्याचे प्रमाण कमी कसे काय ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर चेअरमन सुनील पाटील, सुकाणू समितीचे एम. आर. पाटील यांनी, ‘सोसायटीची उलाढाल वाढली असली तर मार्जिनचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी मार्जिन १.७३ टक्के होते. आता ०.८९ टक्के मार्जिन आहे. शिवाय ठेवीवरील व्याजदरासाठी जादा रक्कम खर्ची पडते’असा खुलासा केला. सोसायटीच्या कामकाजावरुन सभासद रणदिवे, सचिन कोळी, गणपती मांडवरक, बाळासाहेब निंबाळकर, वैशाली देशमुख यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
……………
सौर ऊर्जेमुळे संस्थेच्या वीज बिलात बचत
सोसायटीला भाडयाच्या माध्यमातून १८ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न मिळते. वीज बिलात बचत करण्यासाठी सोसायटीच्या मुख्य कार्यालयावर सौर ऊर्जा पॅनेल सिस्टीम बसविले आहे. यामधून रोज १०० ते १०५ युनिट वीज निर्मिती होत आहे. संस्थेचे मासिक बिल ७५ टक्केंनी कमी झाले आहे. वीज बिलात दरमहा चाळीस हजारपर्यंत बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष साताप्पा मगदूम यांनी आभार मानले. संचालक सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजीत पाटील, मुजम्मिल अहमद नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, रविंद्र जरळी, अजय शिंदे, संजय शिंदे, श्रीकांत चव्हाण, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, नंदीप मोरे, जयकुमार रेळेकर, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, दिलीप पाटील, दीपक बुरुड व्यासपीठावर होते. सुकाणू समितीचे विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, राजाराम वरुटे, साताप्पा मोहिते, एम. एम पाटील, एम. एम भाटे, रवी पाटील, राजीव परीट, सुरेश कोळी, कृष्णात कारंडे आदी उपस्थित होते.