अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलन
schedule27 May 26 person by visibility 38 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 'सारथी' आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पुढील पंधरा दिवसात एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अन्यथा तीव्र 'हलगी बजाव' आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मराठा महासंघ युवा आघाडीतर्फे आयोजित युवक मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे प्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रतीक साळुंखे, विवेक तडोलकर उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, "सध्या शैक्षणिक प्रवेशांची धामधूम सुरू आहे, परंतु विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळत नाहीत. त्यातच गेल्या आठ महिन्यांपासून महामंडळाच्या लाभार्थ्यांचा व्याज परतावा रखडल्याने कर्जदार तरुण हवालदिल झाले आहेत. 'सारथी' संस्थेचे सर्वच उपक्रम सध्या ठप्प आहेत. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी चांगल्या चाललेल्या या संस्था बंद पाडण्याचा डाव मराठा तरुण कधीही सहन करणार नाहीत."आगामी काळात जिल्ह्यातील मराठा महासंघाची मोठी जबाबदारी युवकांवर सोपवली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. डॉ श्रीराम साळुंखे, विवेक तडोलकर, सतेज पाटील, महेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रतिक साळुंखे यांनी स्वागत केले. मेळाव्यास उपस्थित डॉ लक्ष्मीकांत नलावडे, राज पाटील, तुषार पाटील, संदीप पोवार, किरण भोसले, आयुष पाडळकर, विराज पाटील, प्रसाद पाटील, संजय राऊत, केदार साळोखे, नीलेश जाधव आदी उपस्थित होते. सूर्यभान इंगळे यांनी आभार मानले.