पिढया बदलतील, वक्ते-श्रोते नवीन असतील ! तर्कतीर्थांचे तर्क मात्र तेच राहतील !!
schedule17 Jul 25 person by visibility 144 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘तर्कतीर्थ लक्ष्मणाशास्त्री जोशी हे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ होते. त्यांचे विचार कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी अशा स्वरुपाची परिषद दहा वर्षांनी पुन्हा भरवावी. त्यावेळी तर्कतीर्थांवर बोलणारे वक्ते बदललेले असतील, त्यांची मांडणी बदललेली असेल, समोर बसलेले तरुण श्रोते बदललेले असतील. पिढ्या बदलतील, पण तर्कतीर्थांचे तर्क मात्र तेच राहतील.’ असे मत ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणसास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार व कार्य’ या विषयावरील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप गुरुवारी (१७ जुलै २०२५) झाला. परिषदेच्या समोराप दिनी डॉ. पटेल यांनी सहभाग घेतला दरम्यान ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीमध्ये परिषदेचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ज्या संवेदनशील वैचारिक भूमिकेतून आयुष्यात विविध स्थित्यंतरे स्वीकारली, ती पाहता ते एक संवेदनशील बुद्धीवादी असल्याचे स्पष्ट होते. वाईसारख्या कर्मठ ठिकाणी तर्कतीर्थांनी केलेले काम ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. वैदिक, मार्क्सवाद, गांधीवाद, काँग्रेस आणि आधुनिक नवविचार अशी वैचारिक स्थित्यंतरे तर्कतीर्थांनी वेळोवेळी अत्यंत जाणीवपूर्वक स्वीकारली. राजकीय सत्तेचा मोह टाळून विश्वकोश निर्मितीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी या कार्याला वाहून घेतले, ही बाबही आजच्या काळासाठी आदर्शवत स्वरुपाची आहे.’
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, तर्कतीर्थांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी ही परिषद म्हणजे एक ज्ञानरुपी तीर्थयात्रा ठरली आहे. या परिषदेने त्यांच्या जीवनकार्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन प्रदान केला आहे. कार्यक्रमात डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सुनीलकुमार लवटे, किशोर बेडकीहाळ, डॉ. राजा दीक्षित, डॉ. संजय ठिगळे, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. नागोराव कुंभार, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. नामदेव माळी, डॉ. अविनाश सप्रे, डॉ. जी.पी. माळी, डॉ. विश्वास सुतार, डॉ. नंदकुमार मोरे उपस्थित होते.
दरम्यान, परिषदेत दिवसभरात विविध सत्रांमध्ये ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट, गांधीवादी विचारवंत डॉ. विश्वास पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ अभ्यासक श्रीनिवास हेमाडे, ज्येष्ठ विचारवंत सरोजा भाटे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी, प्रख्यात विचारवंत अशोक राणा आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर या विद्वतजनांनी तर्कतीर्थांच्या विविध पैलूंचा वेध घेतला.