फुटबॉलच्या येत्या हंगामापासून मुलींच्यासाठी शाहू छत्रपती वूमेन्स लीग - मधुरिमाराजे छत्रपती
schedule17 Aug 26 person by visibility 7 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘फुटबॉलच्या येत्या हंगामापासून मुलींच्यासाठी शाहू छत्रपती वूमेन्स लीग व ज्युनिअर लीग सुरू होत आहे.यामुळे मुलींना नियमित स्पर्धा, प्रशिक्षण व स्वतची गुणवत्ता सिद्ध करता येईल, त्यांच्या कौशल्याला लीगचे व्यासपीठ महत्वाचे ठरेल.’ असे मधुरिमाराजे छत्रपती यांनी सांगितले. कोल्हापुरातील फुटबॉल संस्कृतीला प्रक्टिस फुटबॉल क्लबने समृद्ध केले असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
निमित्त होतं,कोल्हापुरातील प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. रविवारी, १६ ऑगस्ट २०२६ रोजी हा कार्यक्रम झाला. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक प्रिया पी. व्ही. यांच्या हस्ते क्लबच्या शतक महोत्सवी लोगोचे अनावरण करण्यात आले. महापौर रुपाराणी निकम, भागीरथी महिला संस्थांच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभंकरोती सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम झाला.१९२७ मध्ये प्रॅक्टिस फुटबॉल क्लबची स्थापना झाली. क्लबतर्फे यंदाच्या फुटबॉल हंगामापासून शतक महोत्सवी वर्ष साजरे होत आहे.
‘प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा शंभर वर्षाचा इतिहास हा मोठा आहे. फुटबॉल वाढीसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. कोल्हापुरातील फुटबॉलप्रेम, खेळाडूंची परंपरा आणि मैदानातील चमकदार कामगिरी ही भारतीय फुटबॉलसाठी प्रेरणादायी आहे. कोल्हापुरात महिला फुटबॉलसाठी जे उपक्रम सुरू आहेत, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. महिला खेळाडूंना मिळणाऱ्या सन्मानाने आपण भारावलो आहोत.’असे उद्गार प्रिया पी. व्ही. यांनी काढले. अरुंधती महाडिक यांनी, ‘कोल्हापुरातील फुटबॉल खेळाला मोठी पंरपरा आहे. येथून मोठे खेळाडू घडण्याची क्षमता आहे. मुलींच्या फुटबॉलमधील सहभाग वाढविण्यासाठी कुटुंबे, क्रीडा संस्था व समाजाने सकारात्मक भूमिका पार पाडली पाहिजे.’
वैशाली क्षीरसागर म्हणाल्या, ‘ प्रॅक्टिस क्लब आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाते अतूट आहे. फुटबॉलच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू.’ महापौर निकम यांनी, ‘प्रॅक्टिस फुटबॉल क्लबची शंभर वर्षाची वाटचाल गौरवास्पद आहे.’असे नमूद केले. फुटबॉल क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत, उपाध्यक्ष संतोष महाडिक, सचिव रमेश मोरे, सदस्य चंद्रशेखर देशपांडे, विजय जाधव, राजेंद्र वायचळ, मारुती सावंत, अनिल महाजन, राजू वाडकर आदी उपस्थित होते.