कोल्हापूरला महापुराचा धोका ! कोल्हापूर-रत्नागिरी, कसबा बावडा-शिये रस्त्यावर पाणी !!
schedule23 Jul 24 person by visibility 999 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पावसाचा जोर, धरणातून वाढलेला विसर्ग आणि नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका संभवत आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नदी काठावरील गावांतील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या आहेत. रस्त्यावर पाणी आल्याने जिल्ह्यातील विविध मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. कोल्हापूऱ्-रत्नागिरीं महामार्गावर केर्ली येथे रस्त्यावर पाणी आले आहे. कसबा बावडा-शिये मार्गावरही पाणी आले आले आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधारा येथे रात्री नऊ वाजता 41 फूट सात इंचावर पोहोचली आहे. ४३ फुटाला धोका पातळी समजली जाते. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केेर्लीनजीक पाणी आल्यामुळे केर्ली- जाेतिबा रोड- पन्हाळा रोड-दानेवाडी-वाघबाळी या पर्यायी मार्गे वाहतूक वळविली आहे. पाणी पातळीत सतत वाढ होत असल्यामुळे कोल्हापूरची रेल्वे वाहतूक बंद होऊ शकते.मिरज-कोल्हापूर रेल्वे सेवा बंद होऊ शकते असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज सरासरी चाळीस मिली मीटर पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये सरासरी शंभर मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आठ राज्य मार्ग व वीस प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत. पर्यांयी रस्त्यांची माहिती नागरिकांना दिली जात असून पर्यायी मार्गानी वाहतुक सुरळीत सुरु आहे. राजाराम बंधारा येथील पाणी पातळी ही १८ जुलैला २३ फुटावर होती. ती मंगळवारी दुपारी ४१ फुटांच्या पुढे जात धोका पातळीकडे वाटचाल करीत आहे. हे सर्व पर्जन्यमान व वेगवेगळ्या बंधाऱ्यांची पाणी पातळी लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी पुराचे पाणी जाऊ शकते, अशा ठिकाणी प्रशासनाने भेटी दिल्या आहेत. काही ठिकाणी नागरिक व कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागु शकते, त्यांच्यासाठी निवारा केंद्रांची तयारीही प्रशाससाने केली असल्याची माहिती त्यांनी दिली. राधानगरी धरण 90 टक्के भरले आहे.
दरम्यान पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून पंचगंगा नदीची पातळी धोका पातळीकडे वाटचाल करीत आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, तसेच काही आपत्तीजन्य बाब वाटत असेल तर याची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा त्यांनी घेतला. सध्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे रस्ते मार्ग बंद होत आहेत.सरकारी यंत्रणांनीं त्यांच्याकडील बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची तपासणी करावी. पाणी पातळी वाढल्यामुळे करवीर, हातकणंगले, इचलकरंजीसह सर्व जिल्ह्यातील गावांमधील लोकांची काळजी घेण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना येडगे यांनी केल्या आहेत.
नागरिकांना पुरस्थितीच्या अनुषंगाने माहिती मिळावी यासाठी प्रशासनाने व्हॉट्सॲप क्रमांक सुरु केला असून तो क्रमांक 9209269995 असा आहे. या क्रमांकावर आपणास जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाची, पर्जन्यमान, बंधाऱ्यांची पाणी पातळी इ. माहिती रिअल टाईम मध्ये मिळेल. याशिवाय नियंत्रण कक्षाचा 1077 हा टोल फ्री नंबर २४ तास सुरु आहे. नागरिकांना माहिती घ्यायची असेल किंवा आपत्ती बाबत माहिती द्यायची असेल तर या क्रमांकावर संपर्क साधावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. कोल्हापूर शहरात 70 हून अधिक लोकांना स्थलांतरित केले आहे