उत्साह, स्वागत - नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा वाजली ! प्रवेशोत्सवासह नशामुक्त कोल्हापूरची शपथ !!
schedule15 Jun 26 person by visibility 19 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : उन्हाळी सुट्टीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा सोमवारी 15 जूनपासून नव्या उत्साहात सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सवामुळे शाळा परिसर आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून गेला.
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड तालुक्यातील नाधवडे विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सवात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुदृढ आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव जल्लोषात पार पडला. सरकारी शाळा म्हणजे सर्वसामान्यांच्या हक्काचे ज्ञानमंदिर’ हा संदेश देत नवागतांचे स्वागत आणि नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी करवीर तालुक्यातील वरणगे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी नियमित शिक्षण, वाचनाची आवड आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले.
दरम्यान, कसबा बावडा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसह शहरातील सर्वच दिव्यांग शाळांमध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत विशेष स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. जिल्ह्यात प्रत्येक शाळेत स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व शिक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’ अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याची आणि समाजात जनजागृती करण्याची शपथ देण्यात आली. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक मूल्यांची रुजवणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.