शिक्षणाधिकाऱ्यांकडून धनगरवाडयातील शाळेतील शिक्षकाचे कौतुक, मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप
schedule02 Dec 24 person by visibility 3599 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : किटवडे धनगरवाडा, आजरा तालुक्यातील शेवटचे ठिकाण. याधनगरवाडाची हद्द संपली सिंधुदुर्ग जिल्हा सुरू होतो. डोंगर कपारीत वसलेले हे गाव. या वाडयावर एकूण ९ कुटुंबे. आजबाजूला जंगल. यामुळे सतत जंगली जनावरांचा वावर.या दुर्गम भागातही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करतात. विशेष म्हणजे, येथील सर्व विद्यार्थी प्रगत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी शाळेला भेट दिली. निवडणूक कामानिमित्त शाळेतील शिक्षक बाहेर होते. मात्र शाळेतील मुलांची प्रगती पाहून शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि येथील शिक्षक उत्तम कोकितकर यांचे कौतुक केले.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने यंदा जिल्हा प्रशासनातर्फे थिमेटिक मतदार केंद्र संकल्पना राबविली होती. आजरा तालुक्यातील किटवडे येथील मतदान केंद्र यासंकल्पनेसाठी निवडले होते. या केंद्राची पूर्वतयारी पाहणीसाठी शिक्षणाधिकारी शेंडकर व आजरा गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी भेट दिली. या केंद्राची पाहणी करताना किटवडे गावाजवळील धनगरवाडा येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असल्याचे अधिकाऱ्यांना समजले. तत्काळ शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी सहकारी अधिकाऱ्यांसह या शाळेला भेट देण्यासाठी रवाना झाल्या.
किटवडे धनगरवाडा गावामध्ये पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. हा परिसर दुर्गम. डोंगर कपारीवर वसलेले. गावची हद्द संपली की सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द सुरू होते. वस्तीवर फक्त ९ कुटुंबे आहेत. गाव परिसरात जंगली श्वापदे, हत्ती, गवेरेडे यांचा वावर असतो. रस्त्यानं जाता-येता सर्प नजरेस पडतात. अशा दुर्गम भागात शिक्षक उत्तम कोकीतकर कार्यरत आहेत. शाळेची पटसंख्या कमी असली तरी सर्व विद्यार्थी प्रगत, शंभर टक्के वाचन-लेखन व गणिती क्षमताधिष्टीत अगदी बोलकी व हजरजबाबी असल्याची प्रचिती शिक्षणाधिकाऱ्यांना आली.
शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट दिली त्यावेळी शिक्षक कोकीतकर हे निवडणूक कामकाजासाठी अन्यत्र गेले होते. मात्र शाळा सुरू होती. विद्यार्थी हजर होते. या शाळा भेटीच्या अनुभवाविषयी शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी ‘ शाळेत अधिकारी आलेत पाहून मुले अतिशय आनंदी झाले. स्वतःच शिक्षक असल्याप्रमाणे मुलांनी शाळेची माहिती सांगितली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसरातील फुले गोळा करून स्वागत केले. छान गीत गायन केल. इतकेच काय इंग्रजी नाटिका सादर करुन दाखवली. विद्यार्थ्यांना १०० पेक्षा जास्त कविता- गाणी तोंडपाठ असल्याचे सांगितले.. दुर्गम गावामध्ये देखील शाळेतील विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करण्याचे व्रत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी घेतल्याचे पाहून भविष्य उज्ज्वल असल्याची प्रचिती आली. शिक्षक उत्तम कोकीतकर यांचे अभिनंदन व शुभेच्छा!” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.