विरोधी आघाडीच्या नेत्यांशी चहापान केला म्हणजे पाठिंबा दिला असे नव्हे, गोकुळमध्ये सत्ताधारी आघाडीसोबत : अशोक चराटी
schedule28 Apr 21 person by visibility 1014 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारुढ आघाडी आणि विरोधी आघाडीत शह, काटशहाचे राजकारण वेगावले आहे. दोन दिवसापूर्वी जिल्हा बँकेचे संचालक व आजरा कारखान्याचे माजी चेअरमन अशोक चराटी यांनी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा दिल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले होते. दरम्यान बुधवारी,ता. २८ एप्रिल रोजी अशोक चराटी यांनी सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शवित गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. तसेच जिल्ह्यात आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक हे आपले नेते असल्याचे चराटी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी आणि आजरा येथील अशोक चराटी यांनी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीसोबत असल्याचे सांगितले. माजी आमदार संजय घाटगे यांच्या हस्ते चराटी यांचा बुके देऊन स्वागत झाले. याप्रसंगी चराटी म्हणाले, ‘निवडणुकीच्या कालावधीत सगळेच उमेदवार, नेते मंडळी घरी येत असतात. घरी आलेल्या मंडळीचे पाहुणचार करण्याची आपल्याकडील प्रथा आहे. माझ्या घरी विरोधी आघाडीचे नेते आले होते. त्यांचा पाहुणचार केला.मात्र चहापान केला म्हणजे पाठिंबा दिला असे नाही. जिल्ह्याच्या राजकारणात आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक हेच आपले नेते आहेत. गोकुळच्य निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला आपला पाठिंबा आहे. आपण सत्ताधाऱ्यासोबत आहोत.’