जिपसाठी ज्या तालुक्यात शक्य आहे, तिथं काँग्रेस आघाडी करणार - सतेज पाटील
schedule19 Jan 26 person by visibility 129 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ज्या ज्या तालुक्यात आघाडी करणं शक्य आहे तिथं आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाणार आहे.’असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी स्ष्पष्ट केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी करवीर तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी, १९ जानेवारी २०२६ रोजी काँग्रेस कमिटीत झाल्या. खासदार शाहू महाराज, आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मुलाखती झाल्या. यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, नगरसेवक राजू लाटकर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे , रामकृष्ण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ‘कोल्हापूर महापालिकेला थोडक्यात महापौर पद हुकले, मात्र जिल्हा परिषदेला काँग्रेसला निश्चित बहुमत मिळेल. निवडणूक लागणार या दृष्टीने जिल्ह्यातून आठ दहा दिवस अगोदर आधीच जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी अर्ज मागवले होते. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात काँग्रेस, स्वाभीमानी शेतकरी संघटना , शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाशी शंभर टक्के आघाडी झाली आहे, फक्त उमेदवारी ठरवण्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, शिरोळ तालुक्यात स्वाभीमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे गटाची आघाडी झाली तर गडहिंग्लजमध्ये चर्चा अंतिम टप्प्यात आहे.’असे पाटील यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी सात सामंजस्य करार केल्याचे सांगितले होते, तेच सामंजस करार मी आता गुगलवर शोधत आहे असा टोला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरसाठी काही आणतील याबाबत शंका असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.
मुश्रीफांना टोला…
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पस्तीस नगरसेवक निवडून आणले म्हणजे पराक्रम केला नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. त्यावर सतेज पाटील यांनी, ‘ ३५ उमेदवार सतेज पाटलांनी मिळवल्या नाहीत, जनतेनं दिल्या आहेत, उमेदवार निवडून देणाऱ्यांचा अपमान असल्याचेही आमदार पाटील यावेळी म्हणाले. नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम आहे.’