सुनीलकुमार लवटेंच्या अमृतमहोत्सवाला सामाजिक कार्याची जोड, व्याख्यान-संस्थांना मदत-शिक्षक परिषद!
schedule03 Oct 24 person by visibility 186 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्येष्ठसाहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांंचा अमृतमहोत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. समाजप्रबोधन व्याख्यान, लवटे यांनी सामाजिक कामासाठी दिलेल्या एक कोटीतून संस्थांना मदत करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अमृतमहोत्सव समितीतर्फे येत्या सात ऑक्टोबर २०२४ रोजी ज्येष्ठ विचारवंत संपादक सुरेश द्वादशीवार यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष प्राचार्य जी. पी. माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. द्वादशीवार यांचे व्याख्यान पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात होत आहे. “ चार्वाक ते पानसरे '’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यानाला प्रारंभ होईल. याप्रसंगी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख प्रमोद मुनघाटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी सामाजिक कामासाठी स्वत:चे एक कोटी रुपये जाहीर केले आहेत. या रकमेपैकी १० लाख रुपये गडहिंग्लज येथील नेत्रदान चळवळीतील अवधूत पाटील यांना देण्यात येणार आहेत. सात ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
अमृतमहोत्सवी समितीतर्फे आयोजित उपक्रमाविषयी बोलताना प्राचार्य माळी म्हणाले,‘ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांचा अमृतमहोत्सवी वर्ष हा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. अमृतमहोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम होतात. तीन महिन्यातून एक प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले जाते. येत्या २८ डिसेंबरला शिक्षकांसाठी शिक्षण परिषद न्यू कॉलेजच्या सभागृहात होत आहे. शिक्षण परिषदेत तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, सदानंद कदम, डॉ. रमेश पानसे यांना आमंत्रित केले जाणार आहे. या परिषदेच्या अनुषंगाने सकाळच्या सत्रात नामवंत लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम दहा शाळेत राबविला जाईल.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बी. एम, हिर्डेकर, गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव संजय कळके, प्रा. सी. एम. गायकवाड, डॉ. प्रविण चौगले, प्रा. टी. के. सरगर, सागर बगाडे, प्रा. जॉर्ज क्रुझ, अमेय जोशी, प्रा. विनय पाटील, विजय एकशिंगे, दीपक जगदाळे, मिलिंद यादव, भाग्यश्री कासोटे - पाटील, अनिल म्हमाने, चंद्रकांत निकाडे, रजनी हिरळीकर उपस्थित होते.