शिक्षण सेवक पद रद्द करा, अन्यथा शिक्षकांचा कुटुंबींयासहित विधानभवनावर मोर्चा- राजाराम वरुटे
schedule18 Mar 25 person by visibility 947 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे यासाठी लढाई सुरू आहे. समान काम, समान दाम हा शिक्षण सेवकांचा अधिकार आहे. सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालून शिक्षण सेवक पद रद्द करावे, अन्यथा येत्या अधिवेशनात विधानभवनावर शिक्षण सेवकांचा कुटुंबींयासहित मोर्चा धडक देईल.’असा इशारा प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाचे राज्य नेते राजाराम वरुटे यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पुढाकारातून मंगळवारी (१८ मार्च २०२५) शिक्षण सेवकांचा कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिक्षक संघाने या आंदोलनाला पाठिंबा दिला. शिक्षण उपसंचालक येथे मोर्चोचे रुपांतर सभेत झाले. याप्रसंगी वरुटे बोलत होते. दरम्यान दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी टाऊन हॉल येथे शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष संभाजी बापट, बी. एस. पाटील, तानाजी धारपवार, श्वेता खांडेकर, शिक्षण सेवक प्रतिनिधी तुषार कुंभार, जावेद तांबोळी यांची भाषणे झाली. यानंतर मोर्चा मार्गस्थ झाला. उन्हाची तमा न शेकडो शिक्षण सेवक व शिक्षकांनी मोर्चात सहभाग घेतला. टाऊन हॉल, दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक ते शिक्षण उपसंचालक कार्यालय असा मोर्चा निघाला.
‘शिक्षण सेवक पद रद्द करा, हमारी युनियन हमारी ताकत, मी शिक्षण सेवक पूर्ण पगार माझा अधिकार, चला तोडू या –शिक्षण सेवक पदाचे साखळदंड’अशा घोषणा देत आणि फलक हाती घेऊन शिक्षकांनी मोर्चा मार्ग दणाणून सोडला. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने झाली.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप पाडळकर म्हणाले, ‘शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे यासाठी लढाई सुरू आहे. आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण सेवकांचा हुंकार उमटला आहे. तो राज्यभर पसरेल. शिक्षण सेवकांना समान पातळीवर आणेपर्यंत लढाई चालू राहील.’ राज्य उपाध्यक्ष सर्जेराव सुतार म्हणाले, ‘शिक्षण सेवकांच्या न्याय हक्कासाठी कोल्हापुरातील मोर्चा हा पहिला आहे. समान काम, समान वेतन मिळालेच पाहिजे. शिक्षण सेवकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले पाहिजे. सरकारने प्रश्न सोडवावा. अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल.’
आंदोलनात शिक्षक संघाचे कृष्णात रेपे, बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, मारुती दिंडे, श्रीकांत चव्हाण, संजय ठाणेकर,उत्तम पाटील, अमर देसाई, भीमराव देशमुख, भीमराव पाटील,दिलीप माने, बाळासाहेब गोरे, रणजीत जठार, विश्वनाथ डवरी, सांगर कांबळे, शिवतेज बाजारी, प्रसात सुतार, अनिल पाटील, शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर,नसीम मुल्ला, वर्षा सनगर, नीता ठाणेकर आदींचा सहभाग होता.
…………………………………
“ शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे यासाठी अगदी योग्य वेळी आंदोलन झाले. या लढयाला नक्की यश मिळेल. सरकारला निर्णय घ्यावा लागेल. आमदारांच्या पगार, पेन्शन व सुविधेत वाढ आणि शिक्षण सेवकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष हा प्रकार योग्य नाही. समान काम, समान वेतन या तत्वाचा अवलंब झाला पाहिजे. शिक्षण सेवक पद रद्द करा, अन्यथा सहा महिन्यांनी विधानभवनावर मोर्चा काढू.”
- राजाराम वरुटे ( राज्य नेते, प्राथमिक शिक्षक संघ- माजी आमदार शिवाजीराव पाटील गट)
………………………………………………………
पुरोगामी शिक्षक संघटना, शिक्षक समितीचा पाठिंबा
शिक्षण सेवकांच्या हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनाला पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील यांनी पाठिंबा दिला. प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनीही आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला.