गुलाबी सिनेमात मैत्री, स्वप्नं अन स्वतःच्या शोधाची हृदयस्पर्शी कहाणी
schedule13 Nov 24 person by visibility 57 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे आणि श्रृती मराठे या तिघींच्या सहजसुंदर अभिनयानी व हृदयस्पर्शी कहानीचा गुलाबी हा सिनेमा २२ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मैत्री, स्वप्नं अन स्वतःच्या शोधाची हृदयस्पर्शी कहाणी या सिनेमात आहे. हा सिनेमा प्रेक्षकांनी नक्की पाहावा, वेगळी अनुभूती येईल असे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले.
या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक कुवळेकर व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, श्रृती मराठे या बुधवारी कोल्हापुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी सिनेमाविषयी माहिती दिली. सिनेमाचे संपर्ण चित्रीकरण राजस्थानात झाले आहे.हृदयस्पर्शी कथानक, गीत संगीत आणि कलाकारांचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत हा चित्रपट मैत्री, स्वप्नं, आणि स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास रंगवतो.
'गुलाबी' चित्रपट जयपूर या गुलाबी नगरीत तीन स्त्रियांच्या अनोख्या प्रवासाची कहाणी सांगतो. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या तिघींच्या आयुष्यातील मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वतःला शोधण्याचा संघर्ष हा चित्रपट प्रभावीपणे मांडतो. एकत्र येऊन आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करणाऱ्या या तिघींच्या प्रवासातून मैत्रीचे गहिरे रंग प्रेक्षकांच्या मनाला भिडतील.
दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “ 'गुलाबी' चित्रपटाचं शीर्षक गीत या तिघींच्या आयुष्यातील उत्साह, आनंद आणि मोकळेपणाचे प्रतीक आहे. या स्त्रीप्रधान चित्रपटाची कथा स्त्रियांच्या नात्यांवर, त्यांची स्वप्नं आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध यांवर आधारित आहे, जी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावेल. हा सिनेमा केवळ महिलांचा सिनेमा नाही, तर प्रत्येक पुरुषाने आपल्या आई, बहिण, पत्नी, मुलगी किंवा मैत्रिणीसोबत बघावा, कारण या सिनेमात जीवनाच्या विविध अंगांचा वेध घेण्यात आला आहे.”