वृक्षारोपणाचा कृतिशील धडा, बोरपाडळेतील खडके अॅकेडमीचा पर्यावरणवादी उपक्रम
schedule13 Jul 26 person by visibility 105 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथील श्री आर आर खडके अकॅडमीने वृक्षारोपणाचा कृतिशील धडा विद्यार्थ्यांना शिकवला आहे. शाळेच्य वतीने प्रत्येक वर्षी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर अंदाजे शंभर वृक्षांच्या बियांची रिकाम्या तेलाच्या डब्यामध्ये माती व सेंद्रिय खत घालून पेरणी केली जाते. एक वर्षभर या झाडांची शाळेचे विद्यार्थी विविध गटांच्या माध्यमातून वेळेवर पाणी देऊन काळजी घेतात. जुलै महिन्यात पावसाचा योग्य संयोग साधून दोन बाय दोन चे खड्डे काढले जातात व या झाडांची शाळेच्या परिसरात लागवड केली जाते.
यंदाही, वृक्षारोपण शिबिर या उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथील श्री आर आर खडके अकॅडमीच्यावतीने वृक्षारोपण शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संस्थापक प्राचार्य अविनाश रघुनाथ खडके म्हणाले की वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक वर्षी किमान पाच झाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे.
निसर्ग संवर्धन व पर्यावरणावादी शिक्षण उपक्रमांतर्गत श्री आर आर खडके अकॅडमी बोरपाडळे संचलित आई विद्यानिकेतन बोरपाडळे, शर्विल खडके हायस्कूल बोरपाडळे, क्रांती जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स बोरपाडळे, पन्हाळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे दरवर्षी वृक्षारोपण शिबिर आयोजित केले जाते. या झाडामध्ये प्रामुख्याने आंबा, जांभूळ, पेरू, लिंबू, शेवगा, आपटा, हिरडा, बेहडा, उंबर यांचा समावेश आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्या क्रांती खडके, उपप्राचार्य अयोध्या पाटील रश्मी पवार, सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक ऋषिकेश जगदाळे यांनी आभार मानले.