प्राचार्य व्ही. एम. पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून घडलेला यशाचा दीपस्तंभ
schedule13 Jul 26 person by visibility 171 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित कॉलेज म्हणून न्यू कॉलेजची ओळख. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हे कॉलेज परिचित आहे. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित या कॉलेजच्या प्राचार्यपदाची धुरा अनेकांनी समर्थपणे सांभाळली. गेली सात वर्षे न्यू कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम करताना विविध शैक्षणिक उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य, संशोधनाला प्रोत्साहन, क्रीडा परंपरेला चालना, कॉलेजच्या नूतन इमारत बांधकामसाठी योगदान देत वेगळी छाप पाडणारे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील हे ३० जून २०२६ रोजी सेवेतून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा युवराज मालोजीराजे छत्रपती, संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, अध्यक्ष बी. जी. बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गौरव करण्यात आला. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर टाकलेला प्रकाशझोत…
प्राचार्य पाटील यांनी न्यू कॉलेजच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळताना विविध क्षेत्रातही काम केले. शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य, प्राचार्य संघटनेचे सचिव, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे सचिव, अभ्यास मंडळ सदस्य, सल्लागार सदस्य, विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीवर कार्य, भरारी पथक सदस्य म्हणून केलेले काम लक्षणीय आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाचे खानापूर (जि. सांगली) येथील उपकेंद्रास मंजुरी मिळण्यासाठी बजावलेली भूमिका मोलाची ठरलीय. अनेकांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कोल्हापुरातील डॉ. काशीनाथ माळी यांनी लिहिलय,‘ निवृत्ती ही केवळ नियमांनुसार एका सेवाकालाची समाप्ती असते; पण व्यक्ती लक्षात राहतात. प्राचार्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने केवळ यश मिळवले नाही, तर गुणवत्ता, संस्कार, शिस्त, संशोधन, सामाजिक बांधिलकी आणि आधुनिकतेचा सुंदर संगम अनुभवला. त्यांचा जीवनप्रवास हा संघर्षातून घडलेल्या यशाचा दीपस्तंभ आहे. शाहूवाडी तालुक्यातील माण-मलकापूरसारख्या दुर्गम भागातून शिक्षण घेत, जिद्द, कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपण उंच शिखर गाठले. या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, थोरल्या बंधूंचे मार्गदर्शन हीच खरी जीवनशक्ती ठरली. रयत शिक्षण संस्थेमधील तब्बल २८ वर्षांची सेवा आणि श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या 'क्वालिटी कॉलेज' म्हणून ओळखणाऱ्या न्यू कॉलेजमधील सात वर्षे सात महिन्यांचा चोवीस तास समर्पित प्राचार्य म्हणून कार्यकाळ हा केवळ सेवेचा कालावधी नाही; तो एक संस्मरणीय ठेवा आहे.
प्राचार्य पाटील यांच्या कालावधीत महाविद्यालयाने मिळवलेला नॅक ए प्लसचा दर्जा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र, विद्यापीठस्तरीय व राज्यस्तरीय परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, सेमिनार, मेळावे, जिल्हास्तरीय युवा महोत्सव, एनएसएस, एनसीसी, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील सलग आठ वेळा मेघनाथ मंगेशकर ट्रॉफी, बीसीए व बीसीएसच्या नवीन वाढीव तुकड्या, विविध कौशल्याधारित व अल्पकालीन व्यावसायिक अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि विशेष म्हणजे प्रवेश प्रक्रियेतील विना तक्रार सुसूत्रता, हे सर्व आपल्या दूरदृष्टीचे, नियोजनकौशल्याचे आणि ध्येयवादी नेतृत्वाचे जिवंत पुरावे आहेत. ’
डॉ. उर्मिलादेवी विनायकराव सूर्यवंशी यांनी प्राचार्य पाटील यांच्या कार्याच्या गौरवार्थ म्हटले, ‘ महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले अथक प्रयत्न, नूतन महाविद्यालयीन इमारतीचे स्वप्न साकार करण्यासाठी केलेले अविरत परिश्रम, विविध स्तरांवरून निधी संकलन करून त्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे नेण्यात बजावलेली आपली मोलाची भूमिका ही आपल्या दूरदृष्टीची, व्यवस्थापन कौशल्याची आणि संस्थेप्रती असलेल्या निस्सीम निष्ठेची जिवंत साक्ष आहे.. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, कौशल्यविकास, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे महाविद्यालयाने यशाची नवी उंची गाठली.’
महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणे, सुवर्णमहोत्सवी इमारतीचे स्वप्न साकार होणे, सात मजली आधुनिक इमारतीचे काम, त्यासाठी निधी संकलन, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज वर्गखोल्या आणि तांत्रिक सुविधांचा विस्तार या सर्व विकासकामांमधून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना भक्कम पाया दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत 'उत्कृष्ट व गुणवंत रयत सेवक पुरस्कार' आणि 'गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्कार' प्रदान करत कार्यकर्तृत्वाला समाजाने दिलेली पोचपावती आहेत.
या अनुषंगाने प्रा. डॉ. प्रविण चौगले यांनी म्हटले आहे,‘जीवनात काही व्यक्ती केवळ शिक्षक म्हणून भेटत नाहीत तर त्या गुरू, मार्गदर्शक, सहकारी, मित्र आणि प्रेरणास्थान म्हणून आयुष्य समृद्ध करतात. आपल्याकडून मिळालेले ज्ञान, माणुसकीचा स्पर्श, वेळोवेळी दिलेले मोलाचे मार्गदर्शन आणि प्रत्येक प्रसंगी दिलेला विश्वास यामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडत गेले. आपल्याकडून शिकलेले धडे हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून, जीवन जगण्याची दिशाच देणारे आहेत.’
प्रा. डॉ. ए. ए. कलगोंडा यांनी प्राचार्य पाटील यांच्या कार्याचा गौरवोल्लेख करताना, ‘डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या आठ वर्षाच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात न्यू कॉलेजच्या सर्वांगिण विकासाला नवी दिशा आणि गती मिळाली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे कॉलेजच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली. सात मजली शैक्षणिक इमारतीचे बांधकाम, कँटीन इमारत, सुवर्णमहोत्सवी भवनची उभारणी ही त्यांच्या कार्याची कायम स्मरणात राहणारी स्मारके आहेत.व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारुन विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे कार्यही त्यांनी यशस्वीरितय पूर्ण केले.’