कोल्हापूर महापालिका शाळेतील ८२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत
schedule10 Jul 25 person by visibility 477 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोल्हापूर पालिकेच्या शाळांतील दहा विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत तर ७२ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. महापालिका शाळांनी खासगी शाळांना लाजविणारी शैक्षणिक कामगिरी केली आहे असे गौरवोद्गार शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत. महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरमधील स्वरा अरुण पाटील व अद्वैत दिलीप पोवार या विद्यार्थीनींनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये संयुक्त पाचवा क्रमांक मिळवला आहे.
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची प्रेरणा महत्वपूर्ण ठरली असून उपआयुक्त कपिल जगताप, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, तत्कालिन उपआयुक्त साधना पाटील, तत्कालिन प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे व प्रशासनाधिकारी डी.सी.कुंभार यांच्या योगदानातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले. शिष्यवृत्ती सराव चाचण्या, जादा तास, शाळा स्तरावर शिष्यवृत्तीच्या धर्तीवर मॉडेल पेपर तसेच महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती स्तरावरुन शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्देशाने विशेष बाब म्हणून कोल्हापूर महापालिका शिष्यवृत्ती पॅटर्न पुस्तिकेचा वापर अशा उपक्रमामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत आपला दबदबा कायम राखला आहे.
शिष्यवृती परीक्षेत कोल्हापूर महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर कडील स्वरा अरुण पाटील (96 टक्के) हिने पाचवा क्रमांक, अद्वैत दिलीप पोवार (96 टक्के), संस्कार शहाजी पाटील (94.66 टक्के) यांनी सहावा क्रमांक, मधूरिमा भरतकुमार जाधव (94.66 टक्के), उत्कर्ष राजाराम प्रभूखानोलकर (92.66 टक्के) याचा आकरावा क्रमांक, शौर्य विशाल जाधव (92 टक्के), काव्या विशाल घोटणे व विराज सुनिल पवार (92 टक्के) याचा बारावा क्रमांक, कोल्हापूर महापालिकेच्या पीएमश्री महात्मा फुले विद्यामंदिरच्या रौनक उत्तम वाईंगडे (93.33 टक्के) याचा नववा क्रमांक, ज्ञानदा दिपक चौगले (91.33 टक्के) हिने चौदावा क्रमांक पटकाविला.
राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत यश संपादन करणाऱ्या शाळानिहाय व विद्यार्थी समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या फक्त जरग विद्यामंदिरकडील राज्य गुणवत्ता यादीत आठ व जिल्हा गुणवत्ता यादीत ४४ विद्यार्थी आहेत. तर कोल्हापूर महापालिकेच्या पीएमश्री महात्मा फुले विद्यामंदिरच्या राज्य गुणवत्ता यादीत दोन व जिल्हा गुणवत्ता यादीत सात विद्यार्थी आहेत. टेंबलाईवाडी विद्यामंदिरातील सात विद्यार्थी, नेहरुनगर विद्यामंदिरचे चार , प्रिन्स शिवाजी विद्या मंदिरातील चार विद्यार्थी,भाऊसो महागांवकर विद्यालयातील एक विद्यार्थी, आण्णासो शिंदे विद्यामंदिर व पी. बी. साळुंखे विद्यामंदिरातील प्रत्येकी एक विद्यार्थी शिष्यृवृत्तसाठी पात्र ठरले आहेत. आठवी शिष्यवृत्तीमध्ये राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलकडील जिल्हा गुणवत्ता यादीत एक विद्यार्थिनी आहे.