महानंदा मोहिते यांच्या घुंगुरमाळा कवितासंग्रहाचे शनिवारी प्रकाशन
schedule11 Jul 25 person by visibility 170 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक विषयावर आधारित, कृषीक्षेत्रांशी नातं जोडणाऱ्या, राजकीय घडामोडीवर भाष्य करणाऱ्या आणि मानवी भावभावनांचे विविध कंगोरे टिपणाऱ्या ‘घुंगुरमाळा’या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (१२ जुलै २०२५) कोल्हापुरात होत आहे. कवयित्री महानंदा मोहिते यांचा हा कवितासंग्रह आहे. या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान खासदार शाहू महाराज भूषविणार आहेत. शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉल येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमासाठी साहित्यिक श्रीराम पचिंद्रे हे प्रमुख पाहुणे आहेत. समीक्षक डॉ. रणधीर शिंदे हे प्रमुख वक्ते तर माई पब्लिकेशन्सच्या ममता सिंधुताई सकपाळ, प्रकाशक पूजा भडांगे यांची प्रमुख उपस्थिती आहे. दरम्यान मोहिते यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. या कवितासंग्रहात विविध विषयावरील ७७ कविता आहेत. कॉलेज जीवनापासून मोहिते यांना लिखाणाची आवड. त्यांच्या कविताही विविध अंकात, नियतकालितकेत प्रसिद्ध झाल्या आहेत. २०१८ ते २०२५ या कालावधीतील कवितांचा समावेश आहे. सामाजिक, कृषी क्षेत्राशी निगडीत, राजकारण, मानवी नातेबंध अशा विविध विषयावरील कविता हे या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. ममता सकपाळ यांनी प्रकाशन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यांच्या प्रकाशन संस्थेतर्फे ‘घुंगुरमाळा’ हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. या समारंभास साहित्यप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.