साने गुरुजी कथामालेचे ५७ वे राज्य अधिवेशन कोल्हापुरात
schedule20 Mar 25 person by visibility 218 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई संचलित आणि साने गुरुजी कथामाला, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५७ वे राज्य अधिवेशन कोल्हापुरातील दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये २२ व २३ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
या राज्य अधिवेशनासाठी राज्यभरातून पन्नासहून अधिक विचारवंत आणि ७०० हून अधिक साने गुरुजीप्रेमी उपस्थित राहणार असल्याची माहिती आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव एम. एस. पाटोळे आणि साने गुरुजी कथामाला, मुंबईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हसन देसाई यांनी दिली .वि.स.खांडेकर प्रशाला येथे आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते.
सानेगुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षात ५७ वे राज्य अधिवेशन कोल्हापूरात होत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामराव कराळे अध्यक्षस्थानी असतील. अधिवेशनचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगावच्या अध्यक्षा सरोज पाटील, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालाचे विश्वस्त मोहनराव मोहाडीकर, आमदार अरुण लाड, प्रा. कमला परुळेकर, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष एम.बी.शेख, आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा आणि साने गुरुजी कथामालेच्या उपाध्यक्षा पल्लवी कोरगावकर, अध्यक्षा सुचेताताई कोरगावकर, उपाध्यक्ष जीनरत्न रोटे, संजीव परीख, रवी मुळीक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आतापर्यंत महाराष्ट्रात ५१ व महाराष्ट्राबाहेर पाच अशी एकूण ५६ अधिवेशनझालेले आहेत . अधिवेशनास येणाऱ्या प्रतिनिधींची निवास व भोजनाची सशुल्क व्यवस्था संयोजन समिती मार्फत केल्याची माहितीही हसन देसाई यांनी दिली या बैठकीस संचालिका नेहा कानकेकर, भरत अलगौडर, मुख्याध्यापक संजय सौंदलगे, रंगराव कांदळकर, वृषाली कुलकर्णी, राजाराम संकपाळ, मारुती शिणगारे आदी मान्यवर उपस्थित होते.