केडीसीसी बँकेत लाडकी बहीण योजनेची खाती झिरो बॅलन्सवर
schedule09 Jul 24 person by visibility 465 categoryराजकीय
झिरो बॅलन्स सुविधेची राज्यातील पहिली बँक* महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजनेसाठी झिरो बॅलन्सवर खाती उघडून घेण्यास सुरुवात केली आहे. खास या योजनेसाठी ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय बँकेने घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभिनव योजना सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. झिरो बॅलन्स सुविधेची राज्यातील पहिली बँक आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकेत नवीन खाते केवळ शून्य बाकीवर उघडण्याची अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. घोषित योजनेचा लाभ मिळण्यासाठी नवीन खाते उघडण्याची सुविधा बँकेत उपलब्ध करून देण्यात येत आहे. बँक, सरकारच्या विविध योजनांची उदाहरणार्थ: संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजना, स्कालरशीप, अंगणवाडी महिला या सारख्या योजनेचे अनुदानाचे वाटप करीत आहे. तसेच; लेक लाडकी योजनाही बँकेने प्रभावीपणे राबवली असून त्यास वांगला प्रतिसाद मिळाला आहे. तरी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीणं योजनेची रक्कम जमा होण्यासाठी जिल्हा बँकेतील कोणत्याही शाखेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्ये देखील सरकारच्या योजनेतील रक्कम जमा करून लाभ घेता येईल. या खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि जीवन सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल. जिल्हा बँकेच्या १९१ शाखा कार्यरत असून कार्यालयीन वेळेत महिला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी झिरो बाकीवर खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील पहिली बँक ठरल्याचेही शिंदे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.