‘मी क्रांती ! मी संघर्ष!’तून क्रांतिसिंहाच्या लेकींनी उलगडलाय स्वांतत्र्यलढयाचा प्रेरक इतिहास
schedule03 Aug 21 person by visibility 1014 categoryसामाजिक
…………..
स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे, प्रतिसरकार स्थापून ब्रिटीशांना सळो की पळो करणारे महान क्रांतिकारक, तत्वनिष्ठ राजकारणी म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांची तीन ऑगस्ट रोजी जयंती. क्रांतिसिंह नाना पाटील यांची लेक श्रीमती हौसाबाई पाटील यांनी ‘मी क्रांती ! मी संघर्ष!’ या पुस्तकातून सारा जीवनप्रवास, क्रांतिसिंहाची क्रांतिकारी लढे, भारतीय स्वातंत्र्यलढयाची कहाणी उलगडली. यानिमित्त यापुस्तकाविषयी….
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर:
क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगतं व्यक्तिमत्व. प्रतिसरकार, तुफानी सेना स्थापन करुन त्यांनी ब्रिटीश सरकारला अक्षरश सळो की पळो करुन सोडले होतं. क्रांतिसिंहांचा हा जाज्वल्य इतिहास साऱ्यांनाच प्रेरणादायी. त्यांच्या कार्यांनी प्रभावित होऊन क्रांतिकारकांची एक फौजच स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होती. हौसाबाई पाटील या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या. क्रांतिसिंहाच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. प्रतिसरकारच्या आंदोलनात सहभाग नोंदविला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढल्या. भूमिगत कारवायात त्या अग्रभागी असायच्या. ब्रिटीश सरकारची इथंभूत माहिती काढून त्या क्रांतिकारकांना पुरवायच्या. आणि मोहिम फत्ते व्हायची. श्रीमती हौसाबाई भगवानराव पाटील यांनी आज वयाची ९५ वर्षे पूर्ण केली आहेत. जवळपास गेल्या शतकभराच्या प्रवासाचा, स्वातंत्र्यलढयाच्या सक्रिय साक्षीदार असलेल्या क्रांतिसिंहाच्या लेकीचं ‘मी क्रांती, मी संघर्ष’ या नावांनी आत्मचरित प्रकाशित झालं आहे.
हे आत्मचरित्र केवळ हौसाताई पाटील यांचा जीवनप्रवासापुरताच मर्यादित नाही तर त्यामधून भारतीय स्वातंत्र्यलढयाचा इतिहास उलगडतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा इतिहास, क्रांतिकारकाच्या मोहिमेच्या त्या साक्षीदार आहेत. यामुळे त्यांचा अनुभव, आत्मकथन म्हणजे भारतीय इतिहासाचा जिवंत ठेवा आहे. हौसाबाईंनी हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्रामासाठी योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांची भूमिका मोलाची होती.
संघर्षमय जीवन जगणाऱ्या हौसाबाईंची ही जीवनकहाणी चित्तथरारक आहे. स्वातंत्र्यांच्या ओढीने आसुसलेली आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे. भूमिगत कारवायातील प्रत्यक्ष सहभागामुळे रोमहर्षक बनली आहे. सर्वात महत्वाचं, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वेगळे योगदान दिलेल्या प्रतिसरकारच्या इतिहासाचा हा अस्सल दस्ताऐवज आहे. त्यांच्या जीवनातील एकेक प्रसंग अंगावर रोमांचे उभे करतात. स्वातंत्र्याप्राप्तीनंतरही हौसाबाई या स्वस्थ बसल्या नाहीत. कष्टकरी, श्रमकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी त्या रस्त्यावर लढल्या. महागाईच्या विरोधातील लढा असो की समान पाणी वाटपाचे आंदोलन प्रत्येक ठिकाणी लढवय्याच्या भूमिकेत राहिल्या. रस्त्यावर उतरुन संघर्ष करताना वैचारिक लढाईतही त्या अग्रभागी राहिल्या. जुलै २०१५ मध्ये सांगली येथे झालेल्या शिवसन्मान जागर परिषदेसाठी त्या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. हौसाबाई म्हणजे मूर्तीमंत लढवय्या, याची साक्षच त्यांनी वयाच्या नव्वदीतही कृतीतून दिली होती.
श्रीमती हौसाबाई पाटील यांची नात दमयंती यांनी हे आत्मकथन शब्दबद्ध केलं आहे. आजीची जीवनकहाणी नातीनं लिहून एका अर्थी स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचा ऐतिहासिक ठेवा प्रकाशमान केला आहे. ‘मी क्रांती ! मी संघर्ष !’ या नावांनी प्रकाशित हौसाबाई पाटील यांचा जीवनप्रवास २४ प्रकरणातून उलगडला. पुस्तकरुपानं शब्दबद्ध झालेल्या या रणरागिणीचं गूज नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. संस्कृती प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी. साईनाथ यांची प्रस्तावना, अॅड. सुभाष पाटील यांचे आई हौसाक्काविषयी दोन शब्द या साऱ्या लिखाणातून वेगवेगळया पैलूंचे दर्शन घडते.
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी प्रस्तावनेत या पुस्तकाची उपयुक्तता सांगितली आहे. कोकाटे यांनी लिहिले आहे, ‘ खरं तर, हे आत्मचरित्र भारतीय स्वातंत्र्यलढयाचा एक प्रेरक इतिहास आहे. यावर एखादा चित्रपट निघू शकतो इतके हे मोलाचे आहे. वंशाला दिवा केवळ मुलगाच असतो असे नाही तर मुलगी ही वंशाचा दिवा असते, हे क्रांतिसिंहाच्या कन्येने देशाला दाखवून दिले आहे. या क्रांतिकन्येने जसा इतिहास घडविला तसाच तो लिहिलादेखील. म्हणून याला मोल आहे. हे आत्मचरित्र घराघरात वाचले जावे. तसेच क्रमंक पाठ्यपुस्तकातून, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात याचा समावेश व्हावा.’