बंडखोरीचे वारे ! रामुगडे, जरग, चव्हाण लढणार अपक्ष म्हणून! नेजदारांच्याकडे लक्ष !
schedule30 Dec 25 person by visibility 76 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पक्ष उमेदवारी देणार म्हणून त्यांनी निवडणूक लढवायची तयारी केली. मतदार संघात संपर्क ठेवला. मात्र ऐनवेळी तिकीट नाकारल्यामुळे अनेकांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सगळयाच पक्षात बंडखोरी उभी ठाकली आहे. माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय जरग, शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शशिकांत बीडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महेंद्र चव्हाण हे निवडणुकीत उतरणार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्या धनश्री सचिन तोडकर यांनी तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
माजी उपमहापौर विक्रम जरग यांचे चिरंजीव अक्षय जरग हे प्रभाग क्रमांक दहामधून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी करत होते. मात्र त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले नाही. सोमवारी, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष रामुगडे हे प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपकडून इच्छुक होते. त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. भागात संपर्क साधला आहे. मात्र पक्षाने त्यांच्याऐवजी अन्य उमेदवार निवडल्यामुळे रामुगडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवू अशी घोषणा केली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांचीही त्यांनी भेट घेतली आहे.
शाहूपुरी येथील माजी नगरसेवक राहुल चव्हाण हे प्रभाग क्रमांक चौदा मधून शिवसेनेकडून लढण्याची तयारी करत होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिवसेना शिंदसोबत होते. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत होते. तिकीट वाटपात त्यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला. मात्र तिकीट वाचवू शकले नाहीत. आता ते अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा केली आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शशिकांत बीडकर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात मार्ग धरला. ते ही निवडणूक लढविणार असल्याचे सांगत आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेक अशोक जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक एकमधून त्यांच्या कुटुंबांतील सदस्याला शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची चिन्हे आहेत. कसबा बावडा येथील माजी नगरसेवक संदीप नेजदार यांची उमेदवारी कापली आहे. ते प्रभाग क्रमांक एकमधून इच्छुक होते. या ठिकाणी काँग्रेसने सचिन चौगले यांना उमेदवारी दिली. यामुळे नेजदार हे नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महेंद्र चव्हाण यांनीही उमेदवार न मिळाल्याने अपक्ष लढणार असल्याचे म्हटले आहे.