गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट, महायुतीचे संचालक गैरहजर राहणार ! काँग्रेसकडून कायदेशीर बाबींचा विचार !!
schedule29 Oct 26 person by visibility 138 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडीवरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील व महायुतीमध्ये राजकीय संघर्ष उद्भवला आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीला महायुतीचे बारा संचालक गैरहजर राहणार असल्याचे वृत्त आहे. अध्यक्ष निवडीच्या बैठकीचा कोरम पूर्ण होण्यासाठी चौदा संचालकांची आवश्यकता आहे. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे तेरा संचालक आहेत. कोरमअभावी बैठक तहकूब झाली तर अध्यक्ष निवड लांबणीवर पडू शकते. या साऱ्या घडामोडीवरुन निर्माण होणारा पेच सोडविण्यासाठी कायदेशीर बाबी, सहकारातील नियमावलींची पडताळणी सुरू आहे. आमदार पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालय येथे वकील दाखल झाले आहेत. कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील दिशा ठरविली जाण्याची शक्यता दिसत आहे.
गोकुळच्या २५ संचालकांच्या जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये समविचारी आघाडीला १३ तेरा महायुतीला बारा जागा मिळाल्या. अध्यक्ष निवडीसाठी २९ ऑक्टोबर रोजी संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे. अध्यक्षपद निवडीत दगाफटका होऊ नये म्हणून समविचारी आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपआपल्या संचालकांना सहलीवर पाठविले आहे. समविचारी आघाडीचे संचालक कर्नाटक सहलीवरुन कोल्हापुरात दाखल झाले आहेत. तर महायुतीचे संचालक गोवा सहलीवर आहेत. महायुतीच्या नेत्यांनी, बुधवारी त्या संचालकांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविली. महायुतीचे संचालक गैरहजर राहणार असल्याचे वृत्त आहे. महायुतीचे संचालक गैरहजर राहिले तर सभेचे कोरम पूर्ण होत नाही. कोरम पूर्ण न झाल्यास अध्यक्ष निवड लांबणीवर पडू शकते. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीतील राजकारणामुळे अध्यक्षपद निवडीत ट्विस्ट निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीची वेळ सकाळी अकरा वाजता आहे. काँग्रेसने अध्यक्ष निवडीसाठी तयारी केली आहे. मात्र अध्यक्ष निवडीवरुन निर्माण झालेल्या ट्विस्टमुळे राजकारण ढवळून निघत आहे.