त्रिभाषा धोरण निश्चित समिती शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर
schedule29 Oct 25 person by visibility 37 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती व कामकाजाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी हे शनिवारी एक नोव्हेंबर 2025 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. समितीच्या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून, कशाप्रकारे लागू करावयाचे याबाबतचे धोरण निश्चित करण्याकरीता सामान्य नागरीक, भाषातज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबधित किंवा संलग्न शासकीय किंवा अशासकीय, खासगी संस्था यांचे अध्यक्ष, सदस्य, राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना यांचे अध्यक्ष, सदस्य, पालक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आंदोलक इत्यादींसोबत संवाद साधणार आहेत. समितीमध्ये डॉ. नरेंद्र जाधव, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, डॉ. वामन केंद्रे, डॉ. अपर्णा मॉरिस, डॉ. सोनल कुलकर्णी- जोशी, डॉ. मधुश्री सावजी, डॉ. भूषण शुक्ल व समग्र शिक्षा अभियान चे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव असणार आहेत.