सध्याच्या युगात वाचकांचे प्रबोधन करणारी पत्रकारिता गरजेची- लक्ष्मीकांत देशमुख
schedule27 Oct 25 person by visibility 23 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " सध्याच्या युगात वाचकांचे प्रबोधन करणारा पत्रकारिता गरजेची आहे. संदर्भ आणि विचार चिरकाल टिकणारे असावेत, जग बघताना पत्रकाराच्या मनात अस्वस्थता असली पाहिजे. हे भान हल्ली कमी होत आहे. पण हे भान आयुष्यभर उदय कुलकर्णी यांनी जपलं. अभिजात पत्रकारितेचा धर्म त्यांनी कटाक्षाने निभावला. हीच अभिजातता, हेच वैज्ञानिक भान त्यांच्या भिरभिर मधून डोकावते. " असे गौरवोद्गार माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले.
गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या भिरभिर या पुस्तकाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अक्षर दालन मित्र परिवाराच्यावतीने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे होते. यावेळी समीक्षक प्रा. रणधीर शिंदे, अनिल नगराळे आदी उपस्थित होते. यावेळी नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. माणिकराव साळुंखे म्हणाले, वैज्ञानिक विचाराचे सजग भान राखून भिरभिर मध्ये आलेले लेख हे सुंदर आहेत. शास्त्राचे अनेक बारकावे या पुस्तकात नोंदवले आहेत. हे खरच विलक्षण आहे. आणि ज्यांना जुन कोल्हापूर समजून घ्यायचं असेल तर भिरभिर वाचलच पाहिजे.
प्रा. रणधीर शिंदे म्हणाले, सलगपणे एखाद्या वर्तमानपत्रात लेखन करणं हे एक आव्हान आहे. अशा स्तंभलेखनात दबाव असू शकतो, पण उदयजीनी या लेखनात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नाचा मागोवा विज्ञानाचे संवेदनशील भान ठेवून घेतला गेला आहे. पत्रकार उदय कुलकर्णी म्हणाले, " आपण माणसातल्या माणुसकीपासून फार दूर गेलो आहोत. आपल ईमान माणुसकीशी असावं. आणि हाच प्रयत्न मी आयुष्यभर माझ्या लेखनातून करत आलो आहे. आजही तुम्हा सर्वांना गेल्या वर्षभरापासून मी भेटू शकलो नाही याबद्दल मनात अस्वस्थता होती. ती अस्वस्थता संपवण्यासाठी या प्रकाशन सोहळ्याचा घाट घातला." यावेळी अनिल नागराळे यांनी मनोगत व्यक्त केले प्रा. डॉ. रूपा शहा यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले
Show quoted text