कहाणी जिद्दी मुलाची, सीए परीक्षेच्या यशाची ! अभिमानस्पद कामगिरी अन् भारावलेले आई-वडील !!
schedule03 Nov 25 person by visibility 610 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : दहावीच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली, त्याने पहिल्याच दिवशी भिंतीवर लिहिलं, दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवायचं…आणि बोर्डाच्या परीक्षेत चक्क ९८ टक्के गुण प्राप्त केले….बारावी परीक्षेतही यशाचा तोच पॅटर्न…बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्याने संकल्प केला की आपण सीए व्हायचं…पुन्हा घरातील खोलीच्या भिंतीवर बोर्ड झळकला, ‘सप्टेंबर २०२५ सीए मिशन...एमएच ०९-३२९!’ (३२९ हे अपेक्षित गुण धरलेले), उराशी बाळगलेलं स्वप्नं साकार करण्यासाठी दिवसरात्र अभ्यास केला….या कालावधीत ना व्हॉटसअप्, ना इन्स्टाग्राम, ना फेसबुकचा वापर… फक्त अभ्यास एके अभ्यास…केवळ संवाद साधण्यासाठी मोबाइलशी संबंध…गेले तीन-साडेतीन वर्षे घेतलेल्याअथक परिश्रमाचे फळ सोमवारी (तीन नोव्हेंबर २०२५) मिळाले. दि इन्स्टिट्यूड चार्टर्ड अकौटंटस ऑफ इंडियातर्फे सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला… ते ही पहिल्याच प्रयत्नात !! कौतुकास्पद बाब म्हणजे कोल्हापूर विभागात द्व्रितीय क्रमांकांचा मानकरी ठरला…ही कहाणी आहे, अभिमान माळी या कोल्हापुरातील युवकाची.
मनात जिद्द असेल तर आपणाला हवं ते आपण साध्य करू शकतो, यशाला गवसणी घालू शकतो हे त्यांनी स्वकृतीतून दाखवून दिले. वयाच्या २३ व्या वर्षी तो सीए झाला. अभिमान हा ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांचा मुलगा. वडील, आई, एक मोठा भाऊ गौरव आणि अभिमान असे चौघांचे कुटुंब. गौरव आणि अभिमान दोघेही महावीर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी. पहिलीपासून दोघेही हुशार. गौरवने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवले. दहावीनंतर तो आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमासाठी पुण्याला गेला. त्यामुळे गौरवच्या अभ्यासाची खोली अभिमानला मिळाली. अभिमान, नववी पास झाला. दहावीच्या वर्गाला सुरुवात झाली. दहावीत शिकत असताना पहिल्याच दिवशी त्यांनी अभ्यासाच्या खोलीत भिंतीवर एक कागदी फलक चिकटवला. दहावी परीक्षेत ९८ टक्के गुण. वर्षभर मेहनत घेतली. दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, ९८ टक्के गुण मिळाले. बारावीत ९६ टक्के गुण मिळाले. या अभ्यासात त्याच्या जिद्द, चिकाटीसोबत आई विद्या माळी यांचा पाठपुरावा लाखमोलाचा. वडिलांचे प्रोत्साहन तर सतत.
बारावीनंतर त्याने ठरविलं, आपण सीए व्हायचं. अभ्यासाच्या खोलीत बोर्ड लिहिला, ‘सप्टेंबर २०२५ सीए मिशन. सीए फाऊंडेशनचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाला. पुढे अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी पुण्याला धाव घेतली. कोल्हापूर असो की पुणे अभ्यासात कधी खंड पडला नाही. सतत लिखाण आणि वाचन. प्रचंड जिद्दीने या परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात आपण सीएची अंतिम परीक्षा पास व्हायचं. यासाठी दिवसरात्र अभ्यास. सप्टेंबर २०२५ मध्ये त्याने कोल्हापुरात सीएची परीक्षा दिली. तीन नोव्हेंबर रोजी अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ६०० पैकी ३८८ गुण मिळवत कोल्हापूर विभागात द्वितीय आला. त्याचे हे यश माळी कुटुंबासाठी अभिमानस्पद आहे.
मुलाच्या या यशाविषयी बोलताना पत्रकार गुरुबाळ म्हणाले, ‘ मुलांनी एखादी गोष्ट ठरवली, आणि ते करून दाखवलं तर तो बापाच्या आयुष्यात आनंदच वेगळा असतो. आणि हाच अत्यानंद चिरंजीव अभिमानने माझ्या आयुष्यात मिळवून दिला. त्याच्या जिद्दीला सलाम तर आहेच शिवाय अभिमानाचा आम्हाला अभिमानच आहे.दहावीला गुण मिळाल्यानंतर सायन्सला प्रवेश घेण्याऐवजी मी सी.ए. होणार असं सांगून कॉमर्स ला त्याने प्रवेश घेतला, आणि फाउंडेशन, इंटर आणि शेवटची फायनल परीक्षा सुद्धा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. एखादी गोष्ट ठरवली आणि त्यासाठी देहभान हरपून जिद्दीने प्रयत्न केले तर यश मिळू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे अभिमान अभिमानचे हे घवघवीत यश.’
…………
सीए परीक्षेचा निकाल…पहाटे कोल्हापुरात….अन् कुटुबीयांला सरप्राइज
अभिमान सध्या पुण्यात आहे. सीए परीक्षेचा निकालाच्या निमित्ताने सोमवारी पहाटे तो कोल्हापुरात आला. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. सकाळी अकरापर्यंत मंदिर व रंकाळा तलाव परिसरात थांबला. घरी कुणाला कसली कल्पना नाही. साडे अकराच्या सुमारास घरी पोहोचला…आई-वडिलांना मिठी मारली… बोलायला शब्द सुचेनात…कसेबसे सीए परीक्षा पास झाल्याचे सांगितलं. मुलगा सीए झाल्याचे कळताच आई-वडिलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. डोळयातून आनंदाश्रू. वडिलांनी मुलाला पुन्हा कडकडून मिठी मारली…‘माझा मुलगा मोठया जिद्दीचा…हे आनंदाश्रू त्याच्या कष्टासाठी आहेत. त्याच्या यशाचे आहेत. वडील म्हणून मी आज खूप आनंदित आहे.’