मुलींची प्रगती म्हणजे संपूर्ण समाजाचे प्रगती : मंत्री चंद्रकांत पाटील
schedule08 Nov 25 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एकविसाव्या शतकात मुलगा- मुलगी असा भेद राहिलेला नाही. मुलींची प्रगती म्हणजे संपूर्ण समाजाचे प्रगती आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
दि कौन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेतर्फे उभारलेल्या विद्यार्थिनी वसतिगृह इमारत उद्घाटन समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री पाटील बोलत होते. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. मंत्री पाटील यांनी आपल्या मनोगतातून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. हे काम पुढील नऊ महिन्यांच्या आत पूर्णत्वास नेले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम म्हणाले की कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या चारही महाविद्यालयामध्ये मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. म्हणून संस्थेने विद्यार्थिनींचे वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला तरी चारही महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या वसतीगृहामध्ये प्रवेश घ्यावा . भविष्यकाळात या वसतिगृहामधील मधील प्रवेश क्षमता वाढवण्याचा संस्थेचा मानस आहे.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सदस्य ॲड.अमित बाडकर, ॲड.वैभव पेडणेकर, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील, पार्वती देवी कुंभार नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, उपस्थित होते. याप्रसंगी वसतिगृह इमारतीचे बांधकाम करणाऱ्या आर्किटेक्ट अनुज मिठारी आणि सिव्हिल इंजिनियर युवराज गोजारे, कॉमर्स कॉलेजमधील सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, एनसीसीमधील कामगिरी, पुरुषोत्तम करंडकासाठी पात्र ठरलेल्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अश्विनी मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी आभार मानले.