एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !
schedule12 Mar 26 person by visibility 61 categoryराजकीयमहानगरपालिका
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : सध्याच्या राजकारणात एकनिष्ठपणा ही तशी दुर्मिळ घटना. प्रत्येक निवडणुकीत नवा पक्ष आणि नवा नेता निवडणारे कमी नाहीत. पदासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडया मारणारे ही भरपूर. मात्र गेली तीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे समर्थक, विश्वासू म्हणून माजी नगरसेवक किरण शिराळे यांना ओळखले जाते. महापालिकेच्या राजकारणात दोनवेळा नगरसेवकपदी काम केलेल्या शिराळे यांनी राजकारणात कधी दलबदलूपणा केला नाही. त्यांचे, नेत्यांवरील एकनिष्ठतेचे फळ चिरंजीवला मिळाले. किरण शिराळे यांचे चिरंजीव, नगरसेवक विशाल शिराळे यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड झाले. महायुतीमधून त्यांची निवड झाली आहे.
विशाल किरण शिराळे हे प्रभाग क्रमांक सातमधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक. त्यांनी चांगल्या मतांनी ही निवडणूक जिंकली. सभागृहातील तरुण, अभ्यासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नूतन सदस्यांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत त्यांनी विविध प्रश्नांची मुद्देसूद मांडणी करत सभागृहाचे लक्ष वेधले. शिराळे कुटुंबाला समाजकारण व राजकारणाचा वारसा काही नवीन नाही. किरण शिराळे यांचे वडील आण्णासो आप्पासो शिराळे हे नगरपालिकेत नगरसेवक होते. १९४८ मध्ये आण्णासो शिराळे यांनी नगरपालिकेत प्रतिनिधीत्व केल्याचे किरण शिराळे यांनी सांगितले.
गोल्डन मॅन म्हणून किरण शिराळे यांची ओळख. १९९५ पासून ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नेतृत्व मानून समाजकारणात, राजकारणात सक्रिय आहेत. २०१० मध्ये ते महापालिका नगरसेवक बनले. शुक्रवार पेठ हा त्यांचा मतदारसंघ. काम करण्याची हातोटी, चांगला जनसंपर्क आणि हसतमुखाने प्रत्येकाशी संवाद साधण्याची शैली ही त्यांची वैशिष्ट्ये. मतदारांनी त्यांना, २०१५ मधील महापालिका निवडणुकीत पुन्हा निवडून दिले. ते विरोधी पक्षनेता बनले. इतर पक्षातील नेत्यांनी, त्यांना उमेदवारी, पदाची आमिषे दाखविली. पण किरण शिराळे यांनी महाडिक यांची साथ सोडली नाही. तब्बल दहा वर्षानंतर महापालिका निवडणूक झाली. यंदाच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव विशाल यांनी ही निवडणूक लढविली. भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. निवडून आल्यानंतर महापालिकेतील सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलानुसार स्थायी समिती सभापतीपदही भाजपाला आले. पक्षाने त्यांच्याकडे स्थायी समिती सभापतिपदाची जबाबदारी सोपविली. नेता आणि पक्षावरील निष्ठा याचे हे फळ असल्याचे शिराळे सांगतात.