परिवहन समितीच्या सभापतिपदी सत्यजीत जाधव ! निवडीवर काँग्रेसचा आक्षेप !!
schedule12 Mar 26 person by visibility 14 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन समिती सभापतिपदी महायुतीतंर्गत शिवसेनेचे नगरसेवक सत्यजीत चंद्रकांत जाधव यांची निवड झाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नगरसेवक दुर्वास कदम यांनी निवडणूक लढविली. जाधव यांना आठ मते तर कदम यांना पाच मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी काम पाहिले.
महापालिकेच्या विविध समिती सभापतिपदाच्या निवडीची प्रक्रिया बुधवारी, बारा मार्च २०२६ रोजी पार पडली. सभापतिपदासाठी शिवसेनेकडून जाधव व काँग्रेसकडून कदम यांचे अर्ज दाखल होते. माघारीच्या मुदतीच्या कालावधीत कुणीची माघार घेतली नाही. हात उंचावून मतदान झाले. जाधव यांना जादा मते पडल्याने त्यांची सभापतिपदी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर समर्थकांनी सभापती जाधव यांची मिरवणूक काढली.
……………………………
‘महायुती तसेच शिवसेना पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. महायुतीच्या सगळया नेते मंडळीची मी आभार मानतो. महापालिकेतील सगळया पदाधिकाऱ्यांची साथ लाभली. समाजकारणाचा वारसा घेऊन मी या क्षेत्रात काम करत आहे. माझे वडील दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, आई माजी आमदार जयश्री जाधव यांच्या कामाचा आदर्श बाळगून मी काम करणार आहे. केएमटीची कोल्हापूरच्या जनतेशी नाळ जुळली आहे. जास्तीत जास्त लोकांना या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग व्हावा यासाठी प्रयत्नशील राहू. केएमटीच्या उत्पन्न वाढीसाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू. नवीन बसेस लवकर कोल्हापूरला उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करणार आहे. येत्या तीन महिन्यात केएमटीमध्ये बदल दिसू लागतील. वर्षभरात केएमटीला नवा चेहरा देऊ.’
- सत्यजीत जाधव, सभापती, परिवहन समिती कोल्हापूर महापालिका
…………………………………………………...................
सभापती निवडीवर काँग्रेसचा आक्षेप
परिवहन समिती सभापती निवड प्रक्रियेवर काँग्रेसने आक्षेप नोंदविला आहे. स्थायी समिती सभापती हे पदसिद्ध सदस्य परिवहन समितीत असतात. पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो असे काँग्रेसने म्हटले आहे. परिवहन समिती सभापती निवडीदरम्यान स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक सत्यजीत जाधव यांच्या बाजूने मतदान केले. स्थायी समिती सभापतींनी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे हे चुकीचे असल्याचा आक्षेप नगरसेवक दुर्वास कदम यांनी घेतला. विरोधी पक्षनेते राजू लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, सुनील मोदी, अमर समर्थ, उमेश पोवार, प्रतापसिंह जाधव, प्रवीण सोनवणे यांनी पीठासन अधिकाऱ्यांसह महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन आक्षेप नोंदविला.