कचरा डेपो परिसरातील रस्त्यांचे भाग्य उजळले, यूथ आयकॉनच्या प्रयत्नातून बदलले रुपडे !
schedule04 Jan 25 person by visibility 76 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : टिप्परमधून वाहून नेला जात असताना रस्त्यावर पडलेला कचरा, पसरलेली दुर्गंधी आणि खराब रस्ते यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त बनले होते. खड्डेयुक्त् रस्त्यामुळे टिप्पर चालकही वैतागलेले. मात्र हे दुखणे सांगायचे कुणाला ? यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी ही समस्या हेरली. त्यांनी या भागाची पाहणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यू ट्यूबच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा केला. आणि निधी उपलब्ध होताच दर्जेदार रस्ते बनविले. हे चित्र आहे, कसबा बावडा येथील झूम प्रकल्प आणि पुईखडी येथील डेपो परिसरातील रस्त्यांचे.
यूथ आयकॉनच्या प्रयत्नातून कचरा डेपो परिसरातील रस्त्यांचे भाग्य उजळले. गेली अनेक वर्षे खराब रस्त्यामुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांनी एकत्र येऊन कृष्णराज महाडिक यांचा सत्कार केला. यानिमित्ताने, इच्छाशक्ती असली तर मार्ग सापडतो आणि समस्या दूर होवू शकते याची प्रचिती आली.झूम प्रकल्प आणि पुईखडी येथील डेपो म्हणजे कचरा टाकण्याची ठिकाणे. शहरातील कचरा या दोन्ही ठिकाणी टाकला जातो. मात्र या दोन्ही परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली. सुमारे दोन महिन्यापूर्वी कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरच्या कचरा समस्येविषयी माहिती घेतली. त्यासाठी कृष्णराज यांनी कसबा बावडयातील झुम प्रकल्प आणि पुईखडी इथल्या कचरा डेपोला भेट देवून पाहणी केली. टिप्पपर मधून फिरून काही घरातील कचरा गोळा करून, नागरिकांच्या अपेक्षा आणि टिपर चालकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
झूम प्रकल्प आणि पुईखडी या दोन्ही ठिकाणी कचरा प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते नव्हते. परिणामी टिप्परमधील कचरा रस्त्यावरच पडायचा. परिणामी या भागातील नागरिक त्रस्त झाले होते. महाडिक यांनी घरोघरी जावून कचरा गोळा करून, या समस्येबद्दलचा व्हिडीओ त्यांच्या युटयूब चॅनेलवर प्रसारीत केला होता. दरम्यान तत्कालिन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीसुध्दा तो व्हिडीओ पाहून कृष्णराज महाडिक यांच्या भूमिकेचं कौतुक केले. इतकंच नव्हे तर महापालिका प्रशासनानं कृष्णराज महाडिक यांना सहकार्याची भूमिका घेतली. केवळ समस्या दाखवून किंवा मांडून गप्प न बसता, कृष्णराज यांनी पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून भरीव निधी आणून दोन्ही कचरा डेपोजवळील रस्त्याचा प्रश्न सोडवला. खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून १ कोटी १२ लाख रुपयांचा निधी आणून, पुईखडी कचरा डेपो जवळील रस्ता बनवला आहे. झूम प्रकल्पाजवळही केंद्र सरकारच्या निधीतून १ कोटी ४० लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवला आहे. दोन्ही ठिकाणी उत्तम दर्जाचे रस्ते झाल्यानं त्या परिसरातील स्थानिक नागरिक आणि टिपर चालक यांना मोठा दिलासा मिळालाय.