अंबाबाई मंदिर विकास आराखडयामुळे धार्मिक पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ
schedule20 Jun 26 person by visibility 44 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशीलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, मंत्री मकरंद पाटील, जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महापौर रुपाराणी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल उपस्थित होते. गृहमंत्री शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी राठोड यांनी दिली.
या प्रकल्पासाठी एकूण २८,०५८ चौरस मीटर जमिनीचे मूल्यांकन केले आहे. त्यापैकी १९,४८९ चौरस मीटर खाजगी क्षेत्राच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या बृहद विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर व देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकाने, अँफिथिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टिपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या प्रमाणावर वाहनतळ प्रस्तावित आहे. हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.