शहरात २२ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा
schedule20 Jun 26 person by visibility 29 categoryमहानगरपालिका
महाराष्ट् न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटली असून धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणीउपसा अत्यंत कमी झाला आहे. परिणामी काळम्मावाडी योजनेतून शहराला नियमित पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने शहर व उपनगरांमध्ये सोमवार २२ जून २०२६ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.
महापालिकेकडून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पर्यायी पाणीउपसा सुरू करण्यात आला असून आगामी पावसाची शक्यता व पंचगंगा नदीची पाणीपातळी लक्षात घेऊन या केंद्रांच्या क्षमतेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. चंबुखडी, पुईखडी व कसबा बावडा फिल्टर हाऊसवरून वितरित होणाऱ्या विविध भागांमध्ये सोमवार, दि. २२ जून व मंगळवार, दि. २३ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. महापालिकेने नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.