महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
खचाखच फुटबॉल शौकिनांनी तुडुंब भरलेल्या शाहू स्टेडियमवर पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने शिवाजी तरुण मंडळाचा सडनडेथमध्ये १-० पराभव करत सतेज चषक पटकावला. पूर्ण वेळेत सामना शून्य गोलबरोबरीत होता. टायब्रेकरमध्ये सामना ४-४ असा बरोबरीत होता.
विजेता पाटाकडील संघास रोख दोन लाख रुपये, चषक आणि उपविजेता शिवाजी संघांस रोख एक लाख रुपये आणि चषक बक्षीस देण्यात आले. सर्वोत्कृष्ट खेळाडू बुलेट मोटरसायकल बक्षीस देण्यात आली.पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धा आयोजित केली होती.
शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ अ या संघांनी अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही संघांनी शाॅर्ट पासिंगचा खेळ केला. शिवाजीच्या गोलक्षेत्रात योगेश कदमने चेंडू हाताळल्याने पंचानी पेनल्टी कीक बहाल केली. पण या सुवर्ण संधीचा फायदा पाटाकडील संघास उठवता आला नाही. प्रतिक बदामे याने मारलेली पेनल्टी कीक गोलरक्षक मयुरेश चौगुलेने उत्कृष्टरित्या रोखत संघावरील संकट दूर केले. मध्यंतरास सामना शून्य गोलबरोबरीत होता.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी गोलची कोंडी फोडण्याचे जोरदार प्रयत्न केले.
शिवाजी संघांच्या साळोखेने मारलेल्या फ्री किक गोलरक्षक राजू मिरियाडाने चपळाईने पंच करत संघावरील संकट दूर केले. पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे पाटील यांचा बायसायकल किकवर गोल करण्याचा प्रयत्न दाद मिळवणारा ठरला. ओमकार मोरे याची चढाई शिवाजी संघांने रोखली. आदित्य कल्लोळीचा ग्राऊंडिंग फटका गोलखांबाजवळून गेला.पूर्णवेळेत दोन्ही संघ गोल करू न शकल्याने पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. पाटाकडीलकडून प्रथमेश हेरेकर, अरबाज पेंढारी, अक्षय पायमल, यश देवणे तर शिवाजी कडून सुयश हांडे, रोहन आडनाईक, संकेत अनिल साळोखे, करण चव्हाण बंदरे यांनी गोल केले. पाटाकडीलच्या रोहित पोवार, शिवाजीच्या ऋतुराज सूर्यवंशी गोल करण्यात अपयशी ठरले. टायब्रेकरमध्ये सामना ४-४ असा बरोबरीत राहिला.
सडनडेथमध्ये पाटाकडीलच्या नबी खानने गोल केला. ओमकार पाटीलचा फटका गोलपोस्टला तटला. प्रतिक बदामेने गोल केला. शिवाजी तरुण मंडळच्या खुर्शीद अलीने पेनल्टी मारली. इंद्रजीत चौगुले फटका गोलरक्षकाने तटवला. सिद्धेश साळोखेचा फटका गोलरक्षकाने रोखला.
बक्षीस वितरण श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
......................
पाटाकडील ओमकार मोरेला बुलेट
पाटाकडीलच्या ओमकार मोरे याने मालिकावीर चा बहुमान पटकावला. त्याला बुलेट मोटरसायकल बक्षीस देण्यात आली. शिवाजी चा मयुरेश चौगुले यांची उत्कृष्ट गोलरक्षक, उत्कृष्ट हाफ प्रथमेश हेरेकर, उत्कृष्ट फाॅरवर्ड आदित्य कल्लोळी याची निवड झाली.