सुनीलकुमार लवटेंचे उच्च कोटीचं दातृत्व ! समाजकार्यासाठी एक कोटीचा निधी !!
schedule23 Jun 24 person by visibility 606 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डॉ. सुनीलकुमार लवटे ! विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, शिस्तबद्ध प्राचार्य, साहित्यिक, संशोधक म्हणून सर्वपरिचित. होतकरु तरुणांच्या पाठीशी ठाम राहणारं, नवोदितांच्या पाठीवर शाबासकी देत त्यांना प्रोत्साहित करणारं, समाजातील विविध संस्थांचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत, विविध साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मुक्त चिंतन मांडणारे..अशा अनेकविध गुणांनी हे व्यक्तिमत्व बहरलेलं. रविवारी, सायंकाळी त्यांच्यातील उच्च कोटीच्या दातृत्वाची प्रचिती कोल्हापूरकरांना घडली आणि मोठया संख्येने उपस्थित नागरिकांनी टाळयांचा कडकडाट करत त्यांच्या दातृत्वाला जणू सलामच केला.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यंदा पंच्याहत्तरीत प्रवेश केला आहे. ११ एप्रिल रोजी त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस झाला. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. डॉ. सुनीलकुमार लवटे अमृतमहोत्सव सत्कार समितीने वर्षभराच्या कार्यक्रमांची निश्चिती केली आहे. महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे मुख्य संवर्धक डॉ. विवेक सावंत यांच्या व्याख्यानाने या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितीजे आणि मानव’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, सचिव विश्वास सुतार, सहसचिव संजय कळके, खजिनदार प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राम गणेश गडकरी सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने गर्दी झाली होती. सभागृह तुडुंब भरले होते. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करण्यासाठी लवटे उभे राहताच संपूर्ण सभागृहाने टाळयांचा कडकडाट केला. जवळपास दहा मिनिटाच्या भाषणात लवटे यांनी आपला जीवनपटच उलगडला. वयाच्या दहाव्या वर्षी कोल्हापुरात ठेवलेलं पाऊल, नोकरी, संसार, ज्ञानसाधना, प्राचार्यपद, विविध संस्थेतील काम असे जीवनातील विविध टप्पे उलगडले. ‘माणसांनी टोकाची कृतीशीलता जपायला हवी अशी धारणा असणारा मी मनुष्य आहे. ” असे स्पष्ट केले.
सहजसंवादी शैलीत बोलताना लवटे यांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचा दाखला दिला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याविषयी बोलले. कबीरांनी दिलेल्या उदाहरणाचा दाखल देत लवटे म्हणाले, ‘ नावेमध्ये जादा पाणी आणि घरामध्ये जादा पैसा झाला तर पाणी दोन्ही हातांनी बाहेर टाकावे. पैसा गरजूंना द्यावा. जादा पैसा आला तर शहाणा माणूस तो पैसा दुसऱ्यांना देतो, इतका शहाणपणा मला तुम्हा साऱ्यांकडून मिळाला आहे. मी काही रक्कम साठविली होती. यंदा माझा अमृतमहोत्सव होत आहे. या कार्यक्रमासाठी तुम्ही सारे इतके मोठया संख्येने आलात तो आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही.
मी, काल माझ्या कुटुंबांतील सदस्यांशी चर्चा केली आणि सामाजिक कार्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबांचा हा विश्वस्त निधी असला तरी त्यावर समाजाचा हक्क राहील. माझ्या कुटुंबांतील कोणीही सदस्य त्याचा लाभार्थी असणार नाही. मी सामाजिक कार्यासाठी ज्या रकमेची घोषणा केली त्या रकमेच्या आकडयाकडे पाहू नका. रककम खूप छोटी आहे. अंधार उजळण्यासाठी एक पणती जेवढं काम करते तेवढं जरी काम झालं तरी त्याचा मला आनंद आहे. मी, यापुढेही अधिक नैतिकतेने समाजसेवा करत राहणार.’