एकल महिलांसाठी विशेष सर्वेक्षण; नगरसेविका मंगल साळोखे यांचा पुढाकार
schedule18 Nov 26 person by visibility 10 categoryमहानगरपालिका
प्रभाग क्रमांक ७ मधील गरजू महिलांना शासकीय योजनांशी जोडण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एकल महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक ७ मध्ये विशेष सर्वेक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका मंगल साळोखे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधील गरजू एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांची आवश्यक माहिती संकलित करण्यात आली. महिलांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची माहिती जाणून घेत त्यांच्या गरजेनुसार शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच संबंधित योजनांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज भरण्याची प्रक्रिया, पात्रतेचे निकष आणि शासकीय कार्यालयांमध्ये करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
नगरसेविका साळोखे म्हणाल्या, ‘समाजातील एकल महिलांना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगता यावे, यासाठी त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा केवळ माहितीअभावी पात्र महिला योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना योजनांची माहिती देणे आणि लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. राज्य सरकार आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून पात्र महिलांना आवश्यक ते सहकार्य यापुढेही केले जाईल.’