बाजार समितीच्या वार्षिक सभेला सोळा संचालक…५५ सभासद ! सभासदांची नगण्य उपस्थिती चिंताजनक ! !
schedule23 Sep 26 person by visibility 64 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे जवळपास बारा हजार सभासद. शेतकरी सभासद, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे प्रतिनिधी, व्यापारी, अडते, तोलाईदार, हमाल असे विविध सभासद आहेत. बाजार समितीची २२ वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी, २३ सप्टेंबर २०२६ रोजी झाली. दरम्यान या सभेप्रसंगी व्यासपीठावर सोळा संचालक आणि समोर सभागृहात ५५ सभासदांची उपस्थिती असे चित्र होते. बाजार समितीचे सभापती प्रा. शेखर देसाई हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. जवळपास दीड तास सभा चालली.
सभेला सभासदांची नगण्य उपस्थिती ठळकपणे दिसत होती. सभागृहातील निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या. सभेची वेळ दुपारी एकची होती. प्रारंभी सभागृहात सभासदांची संख्या तीसपर्यंत होती. सभा संपताना उपस्थितांची संख्या ५५ पर्यंत पोहोचली. दरम्यान या सभेत व्यापारी सभासद संजीव परीख, वैभव सावर्डेकर, सलीम बागवान, अडत दुकानदार महेश वारके, शेतकरी दादासो नामदेव पाटील निगवे दुमाला, दत्तात्रय भिकाजी पाटील यवलूज, अर्जुन पाटील आदींनी बाजार समितीतील रस्ते दुरुस्ती, शेतमालाला भाव, परिसरातील स्वच्छता अशा विविध विषयाकडे लक्ष वेधले. व्यापाऱ्यांनी मार्केट सेस रद् करण्याची मागणी केली. वारके यांनी यार्डातील कचरा उठाव प्रभावीपणे झाले पाहिजे. याकरिता ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची संख्या वाढवावी. बाजार समितीचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीसह व्यापाऱ्यांची देखील आहे असे त्यांनी नमूद केले. दादासो पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा, नियमानुसार कामकाज झाले पाहिजे अशी मागणी केली. या सभेत, साऱ्यांनीच मार्केट यार्ड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकर उभारावा अशी मागणी केली.
आदर्श बाजारपेठ बनविण्यासाठी प्रयत्नशील….
बाजार समिती सभापती प्रा. देसाई यांनी, सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. रस्ते दुरुस्ती, कचरा उठाव याविषयी उपाययोजनांची माहिती दिली. गेट नंबर चार ते गेट नंबर सातपर्यंतचा रस्ता पावसाळयानंतर दुरुस्त करू. कचरा उठावचे नियोजन केले आहे. असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती आदर्शवत बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उत्पन्न वाढीसाठी नियोजन आहे. सध्या बाजार समितीच्या ठेवी २१ कोटी ४० लाखापर्यंत आहेत.बाजार समितीचे कार्यालयीन कामकाज संगणीकृत करणे, समितीच्या मालकीच्या जागांवर शेतीमाल खरेदी विक्री व्यवसायासाठी दुकानगाळे उभारणी प्रस्तावित आहे.गुळाची गुणवत्ता तपासणीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारणी, समिती आवारातील व्यापारी व शेतकऱ्यांकडून मागणी आल्यास चाळणी यंत्र बसविण्यात येईल असे सांगितले. साऱ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारू असे स्पष्ट केले. सचिव तानाजी दळवी यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. उपाध्यक्ष पांडूरंग काशीद यांनी आभार मानले. सभेला बाजार समिती संचालक अॅड. प्रकाश देसाई, भारत पाटील भुयेकर, नानासो कांबळे, पैलवान संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील, शंकर पाटील, संदीप वरांडेकर, सुयोग वाडकर, शिवाजी पाटील, नंदकुमार वळंजू, सोनाली शरद पाटील, मेघा राजेंद्र देसाई, कुमार आहुजा, आकाराम केसरे आदी उपस्थित होते. संचालक सुर्यकांत पाटील गैरहजर होते.