ठाकरे गटाकडून सतरा उमेदवार घोषित, सांगलीतून चंद्रहार पाटील
schedule27 Mar 24 person by visibility 498 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी सतरा उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली. यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली. ठाकरे गट एकूण २२ जागा लढविणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.जाहीर झालेल्या सतरा जागांच्या यादीमध्ये विद्यमान खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अरविंद सावंत यांचा समावेश आहे. दुसरीकडे या यादीत हातकणंगलेचा समावेश नाही. यावरुन हातकणंगलेबाबत मात्र अजून निर्णय झाला नसल्याचे दिसत आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. काँग्रेस, विशाल पाटील यांच्यासाठी आग्रही आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती. मात्र काँग्रेसकडून दावा सुरू असल्यामुळे नेमके उमेदवार कोण हा संभ्रम होता. मात्र ठाकरे गटाने सतरा उमेदवारांच्या यादीमध्ये सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली. यामुळे महाविकास आघाडीचे तेच उमेदवार हे स्पष्ट झाले.
बुलढाणा येथून प्रा. नरेंद्र खेडेकर, यवतमाळ येथून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, रायगडमधून अनंत गिते, सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, ठाणे येथून राजन विचारे, मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई वायव्यमधून अमोल किर्तीकर, परभणीमधून संजय जाधव, दक्षिण मध्य मधून अनिल देसाई यांचा समावेश आहे.
……………………………………
उर्वरित पाच जागा दोन दिवसात जाहीर
हातकणंगले, मुंबई उत्तर, पालघर, कल्याण डोंबिवली अशा पाच जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार घोषित झाले नाहीत. येत्या दोन दिवसात या ठिकाणचे उमेदवार घोषित करू असे खासदार राऊत यांनी सांगितले.
…………………………………………
हातकणंगलेत उमेदवार की शेट्टींना पाठिंबा !
हातकणंगलेत शिवेसना ठाकरे गटाचा स्वतंत्र उमेदवार देणार की स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. स्वाभिमानीचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतंत्र लढणार असून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा असे म्हटले आहे. तर महाविकास आघाडीने त्यांनी आघाडीत समावेश व्हावा असा आग्रह आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील यांची नावे चर्चेत आहेत.