शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पानंतर व्यापक बैठक
schedule04 Mar 26 person by visibility 91 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिक्षक संघाचे राज्य नेते माधवराव पाटील, राज्याध्यक्ष केशवराव जाधव, राज्य सल्लागार राजाराम वरुटे, राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष बबन केकरे, डी.पी. पाटील, बजरंग लगारे, प्रताप राबाडे यांच्या शिष्टमंडळाने, शिक्षक आणि शाळेशी निगडीत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या दालनात ही भेट झाली. याप्रसंगी आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते.शिक्षकांच्या न्याय मागण्या, सेवा विषयक अडचणी मांडल्या. या भेटीत शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.यासंदर्भात राज्य सल्लागार राजाराम वरुटे म्हणाले, ‘शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. टीईटी परीक्षेकडे लक्ष वेधले. मुख्यालय राहण्याची अट रद्द करावी हा मुद्दा निदर्शनास आणला. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिक्षकांशी निगडीत जी जी प्रश्ने आहेत, त्यासंबंधी मार्ग काढण्यासाठी बैठक घेऊ या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.’