Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुश्रीफ –कोरेंच्यामध्ये ऑल इज नॉट वेल…एकेकाळच्या मित्रांत वाढतेय राजकीय अंतर !जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकमत होईना, जिप अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टातसरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात कोर्टात आव्हान, दोन एप्रिलला सुनावणीदुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना -  चेअरमन नविद मुश्रीफशिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पानंतर व्यापक बैठक श्रीशैल देवस्थानात सोळा ते वीस मार्च दरम्यान उगादी महोत्सव जिल्ह्यात सोळा मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम, नो हेल्मेट - नो एट्री जात प्रमाणपत्रे खोटी, नगराध्यक्षसह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविकेंवर गंभीर आरोप, नऊ मार्चला कोल्हापुरात मोर्चाकळंबा तलावात कचरा, टाकाऊ वस्तू, खरमातीचा ढिगारा ! कळंबा -पाचगाव ग्रामपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष!!कैलासगडची स्वारी मंदिर पालखी सोहळा दिमाखात

जाहिरात

 

मुश्रीफ –कोरेंच्यामध्ये ऑल इज नॉट वेल…एकेकाळच्या मित्रांत वाढतेय राजकीय अंतर !

schedule05 Mar 26 person by visibility 186 categoryजिल्हा परिषद

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासंबंधी निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीत जिल्ह्यातील दोन बडया नेत्यांमधील मतभेद समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व आमदार विनय कोरे यांच्यामध्ये रंगलेला कलगीतुरा चर्चेचा ठरला. राजकारणात गेली अनेक वर्षे मैत्री सांभाळणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये गेले काही दिवस राजकीय अंतर वाढत असल्याचे चित्र आहे.

नगरपालिका निवडणुकीपासून हे दोन्ही नेते आमनेसामने उभे आहेत. गडहिंग्लज नगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाने उमेदवार दिले. शिवाय मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधातील आघाडीला बळ दिले. कोल्हापूर महापालिका निवडणुकीतही कोरे यांनी जवळपास २९ उमेदवार उभे केले होते. जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांनी पन्हाळा, करवीरमध्ये ताकतीने उतरत उमेदवार निवडून दिले. हातकणंगले तालुक्यात कोरे यांच्या विरोधातील आघाडीला मुश्रीफांनी ताकत पुरविल्याची चर्चा निवडणुकीतही रंगली. पन्हाळा पंचायत समितीत गेली अनेक वर्षे कोरे यांची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येत आमदार कोरे यांना सत्तेपासून दूर ठेवले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनसुराज्यला पन्हाळा व हातकणंगलेतील काही हक्काच्या जागेवर पराभव पत्करावा लागला. या साऱ्या खेळी जनसुराज्यच्या जिव्हारी लागल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला २०, भाजपला १२, शिवसेनेला नऊ, जनसुराज्यला सहा तर राजर्षी शाहू आघाडीचे चार उमेदवार निवडून आले.सर्वाधिक सदस्य संख्या असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अध्यक्षपद आमचाच होणार असा पवित्रा घेतला आहे. तर भाजप, जनसुराज्य मिळून सदस्य संख्या १८ पर्यंत जाते. शिवाय शिवसेनेचे नऊ सदस्य आहेत. ही सदस्य संख्या २७ पर्यंत जाते.यामुळे अध्यक्षपद भाजपला मिळावे अशी आग्रही मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यामुळे अध्यक्षपद कोणाला हा तिढा अद्याप सुटला नाही.जिल्हा परिषद अध्यक्षपद, विविध समित्यांवरील निवडी आणि गोकुळचे राजकारण या अनुषंगाने मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अमोल महाडिक राहुल आवाडे, शिवाजी पाटील, आमदार चंद्रदीप नरके,  माजी आमदार प्रकाश आवाडे, संजय घाटगे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, प्रा जयंत पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.

मंत्री मुश्रीफ यांनी जादा सदस्य असल्यामुळे राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळावे असा मुद्दा लावून धरला. या चर्चेत आमदार कोरे यांनी इतर पर्यायही विचारात आणावे असा मुद्दा मांडत विषयाला कलाटणी दिली. तेव्हा मुश्रीफ यांनी महापालिका निवडणुकीतील निकालाकडे लक्ष वेधले. ‘आमदार कोरे यांनी महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढताना आमच्याविरोधी उमेदवार दिले.  त्यांच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादीच्या, उमेदवारावर परिणाम झाला.’असा सूर मुश्रीफ यांनी आळवला. आमदार कोरे यांनी तत्काळ मंत्री मुश्रीफ यांचा मुद्दा खोडून काढला. बैठकीतच कोरे यांनी, ‘महापालिका निवडणुकीसंदर्भात एक निर्णय झाला होता, स्वबळावर निवडणूक लढायचे ठरले होते. त्या निर्णयानुसार आम्ही स्वतंत्र लढलो. याउलट जिल्हा परिषदेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढायचे ठरले होते. मात्र राष्ट्रवादीने ठिकठिकाणी स्वतंत्र आघाडी कशासाठी केली ?’ असा सवाल उपस्थित केला.

काही वर्षापूर्वी जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो, स्थानिक स्वराज्य संस्था असोत की सहकारातील संस्थात्या ठिकाणी मंत्री मुश्रीफ आणि आमदार कोरे

एकमेकांना पूरक भूमिका घेत होते. काही वेळेला पक्षीय चौकट ओलांडून एकमेकांना मदत केल्याची उदाहरणे आहेत. जिल्हा बँकेच्या गत निवडणुकीतील घडामोडी साक्ष देणाऱ्या आहेत. सध्या मात्र दोघांमध्ये ऑल इज वेल नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. नगरपालिका असो की महापालिका, जिल्हा परिषद असो की पंचायत समितीप्रत्येक निवडणुकीत या दोघांतील राजकीय अतंर वाढत असल्याचे चित्र आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes