रस्ते कामात गोलमाल ! अत्यल्प डांबर, मापापेक्षा कमी जाडी !! कृती समितीचा आरोप
schedule13 Dec 24 person by visibility 410 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रस्ते डांबरीकरण कामात अधिकारी आणि ठेकेदारांची लूटमार सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत असा आरोप कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केला आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या नावाखाली विद्रूपीकरण होत असल्याचा आक्षेप नोंदविला. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.
कोल्हापूर शहरात शासकीय निधीतून रस्ते डांबरीकरणाची कामे सुरू आहे. मात्र दर्जाहीन डांबर खडी व साहित्य वापरून मापापेक्षा कमी जाडी व उंचीचे थर देऊन डांबर कमी वापरले जात आहे. डांबरांमध्ये जळक्या ऑइलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे यामुळे रस्ते कामाचा दर्जा टिकणार नाही रस्ते लगेचच उघडले जाणार आहेत.
मंगळवार पेठेतील करवीर भूमापन कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर असणारी धूळ आणि मातीचा थर न काढताच त्यावरच किरकोळ प्रमाणात ऑइल मिश्रित डांबर शिंपडून त्यावर डांबरी खडीचा थर देण्याचा प्रकार घडला. सुस्थितीत व चकचकीत असणाऱ्या रस्त्यावरच पुन्हा विनाकारण डांबरीकरण करण्याचा प्रकार रुईकर कॉलनी परिसरात केला आहे. पूर्वीचा मूळ रस्ता ८० फुट ते ६० फुट रुंदअसताना संपूर्ण रस्त्याच्या रुंदीचे डांबरीकरण न करता दोन्ही बाजूला १० फुटापेक्षा जास्त जागा रिकामी सोडून फक्त मध्येच दर्जाहीन डांबरीकरण करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी सर्रासपणे सुरू आहे त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा खरमाती साठवून त्या ठिकाणी अतिक्रमणे वाढत आहेत म्हणजे महापालिकेच्या वतीने रस्त्याची रुंदी कमी केल्याचा प्रकार घडत आहे ज्यांनी रस्त्यासाठी स्वतःची जागा सोडली त्यांच्यावर अन्याय होणार नाही का ? असा सवाल केला आहे
निवेदन अशोक पोवार ,रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, सदानंद सुर्वे , चंद्रकांत सूर्यवंशी , विनोद डूणूंग , प्रकाश आमते ,लहुजी शिंदे ,इंजिनीयर रमेश पोवार ,इंजिनीयर महेश जाधव ,शंकरराव शेळके ,महादेव जाधव ,प्रसाद बुलबुले ,सुरेश कदम , प्रा .शिवाजी पाटील . ॲड .प्रमोद दाभाडे ,अमृत शिंदे ,नंदकुमार टोणपे ,अजित सासणे ,चंद्रकांत पाटील ,शाहीर दिलीप सावंत यांनी दिले आहे.