प्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !!
schedule21 Oct 24 person by visibility 192 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मागील तीनही निवडणुकीत मतदानाचा वाढता आलेख आहे. २००९ मधील विधानसभा निवडणुकीत ६९.२० टक्के , २०१४ मधील निवडणुकीत ७०.०१ टक्के तर २०१९ मधील निवडणुकीत ७४.९७ टक्के मतदान झाले होते. याही वेळी विधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सर्व पात्र मतदारांना आवाहन करण्यात येत असल्याचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व करवीरचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक प्रक्रियेची माहिती सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपविभागीय अधिकारी धार्मिक म्हणाले, ‘धार्मिक पुढे म्हणाले, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात एकूण ३५४ मतदान केंद्रे आहेत. नवीन २६ मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. शहरी भागात १८६ तर ग्रामीण भागात १६८ मतदान केंद्रे आहेत. मतदार संघात एकूण मतदार तीन लाख ६८ हजार ९९९ आहेत. यामध्ये व्हीआयपी मतदार ६१, सैन्य दलातील मतदार ५०८, १८ ते १९ वयोगटातील मतदार दहा हजार ५४ आहेत. या मतदार संघात महसूली गावे- ३७, महसुली मंडळ-पाच, ग्रामपंचायती ३५, जिल्हा परिषद गट - पाच, पंचायत समिती गण- दहा,कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग- ३३ आहेत.’
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ नामनिर्देशन पत्र भरण्याची कार्यवाही २२ ऑक्टोबर २०२४ पासून करवीर उपविभागीय कार्यालय, कोल्हापूर येथे होणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दरम्यान २६ व २७ ऑक्टोबर २०२४ रोजी शासकीय सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र भरण्याची कारवाई होणार नाही. उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत चार नोव्हेंबर,दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर जे उमेदवार कायम झाले आहेत त्यांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया उप विभागीय कार्यालय, करवीर, जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क येथे होणार आहे. निवडणूकीसंदर्भातील पुढील सर्व कार्यवाही व्ही. टी. पाटील सभागृह राजारामपुरी येथे होणार आहे. या ठिकाणाहूनच पथकाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे आणि स्ट्रॉंग रूम ही तेथेच बनविण्यात आली आहे. तसेच मतमोजणी प्रक्रिया सुद्धा व्ही. टी. पाटील सभागृह राजारामपुरी येथेच होणार आहे अशी माहिती धार्मिक यांनी दिली.