ग्रामसेवकांची झाडाझडती, अधिकाऱ्यांना कानपिचक्या ! सीईओंची चंदगडला आढावा बैठक !!
schedule02 Jan 25 person by visibility 146 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निधी उपलब्ध आहे, मात्र खर्च करण्याचे नियोजन नाही. मुदतीत कामांची पूर्तता नाही. यावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या तर ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली. कामचुकार ग्रामसेवकांच्या दोन वेतनवाढी रोखण्यात येतील असे सीईओंनी सांगितले.
चंदगड येथील पंचायत समितीच्या सभागृहात सीईओ कार्तिकेयन एस यांनी बुधवारी (१ जानेवारी) आढावा बैठक घेतली. पंधरावा वित्त आयोग, जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानमधील कामांचा आढावा घेतला. नववर्षारंभाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी विकासकामांवरुन ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चार्ज केले. ग्रामसेवकांच्या कारभारात सुधारणा झाल्या पाहिजेत असे त्यांनी सुनावले. पंधराव्या वित्त आयोगाला सुरुवात होऊन चार वर्षे उलटले. मात्र अनेक गावांना मंजूर निधीच्या पन्नास टक्के ही खर्च झाला नाही. ग्रामपंचायतीचा हा सारा कारभार लाजिरवाणा असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानतंर्गत कामातही सुधारणा गरजेच्या आहेत असे त्यांनी नमूद केले. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापनसाठी सूचना केल्या. या कामात सुधारणा झाल्या नाहीत तर कारवाईचा इशारा दिला.
बैठकीला ग्रामीण विकास प्रकल्प संचालक सुषमा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक माधुरी परीट, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कराड यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. गटविकास अधिकारी बाळासाहेब भोंगे यांनी स्वागत केले.